यवतमाळ । ओबीसी समुदायाची जातनिहाय जनगणना न झाल्यास यावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन विधानसभाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. ते येथे आयोजित सत्काराला उत्तर देतांना बोलत होते.
महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेस, शेतकरी न्यायहक्क आंदोलन समिती व ओबीसी, एसबीसी, व्हीजेएनटी आंदोलन फ्रंट यांच्या वतीने येथे विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार वामनराव कासावार होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार ख्वाजा बेग, माजी आमदार विजयाताई धोटे यांची उपस्थिती होती. याप्रसंगी सत्काराला उत्तर देतांना नाना पटोले म्हणाले की, देशात बहुसंख्येने असलेल्या ओबीसींची जनगणना व्हावी ही अत्यंत रास्त मागणी आहे. त्याशिवाय या समाजघटकाला योग्य न्याय मिळणार नाही. त्यामुळे केंद्र सरकारने ओबीसी कॉलम समाविष्ट करावा यासाठी सर्वस्तरातून दबाव निर्माण झाला पाहिजे. महाआघाडी सरकारने पहिल्याच अधिवेशनात शेतकर्यांच्या कर्जमुक्तीचे धोरण जाहीर केले. आता लवकरच शेतकर्यांना कर्जातून मुक्ती मिळेल त्याबद्दल महाआघाडी सरकारचे त्यांनी अभिनंदन केले. मात्र हे सरकार जेव्हा शेतकरी व जनसामान्यांच्या विरोधात निर्णय घेईल तेव्हा राजदंडाचाही वापर करण्यास आपण विचार करणार नाही असे ते म्हणाले.
यावेळी नानाभाऊ पटोले यांना विधानसभेची प्रतिकृती व चित्रकार उमेश चारोळे यांनी रेखाटलेले चित्र भेट देऊन सर्व मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक व महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देवानंद पवार यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन विद्या चिंचोरे यांनी केले.