पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज । पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री. शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय पाचोरा यांच्या कनिष्ठ महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष हिवाळी शिबिर २४ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२२ च्या दरम्यान ओझर ता. पाचोरा येथे आयोजित करण्यात आले होते.
सदर शिबिराचे उदघाटन कनिष्ठ महाविद्यालयीन व्यवस्थापन समितीचे प्रमुख सुरेश देवरे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेच्या दक्षता समितीचे प्रमुख सुभाष तोतला उपस्थित होते. या उदघाटनाच्या कार्यक्रमप्रसंगी धरणगाव महाविद्यालयात कार्यरत प्रा. राखी पाटील यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांना अनमोल मार्गदर्शन केले.
या विशेष दिवाळी शिबिरात सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. अतुल सूर्यवंशी यांनी सर्व स्वयंसेवकांना योगाची माहिती सांगून योगाची प्रात्यक्षिके करून घेतली. या विशेष हिवाळी शिबिराच्या दरम्यान महाविद्यालयीन स्वयंसेवकांना श्रमदानाच्या सोबतच निबंध स्पर्धा, सामान्य ज्ञान स्पर्धा, संगीत खुर्ची, वाद – विवाद स्पर्धा, मेहंदी स्पर्धा, क्रीडा स्पर्धा अशा विविध गुणदर्शनपर स्पर्धा घेण्यात आल्या. या शिबिरात राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांसाठी आयोजित बौद्धिक सत्रात दि. २५ डिसेंबर रोजी चला समृद्ध जीवन जगूया या विषयावर डॉ. संजय माळी यांनी मार्गदर्शन केले. दि. २६ डिसेंबर रोजी पाचोरा येथील तहसिलदार कैलास चावडे यांनी नागरिक व प्रशासन या विषयावर स्वयंसेवकांची चर्चा केली. दि. २७ डिसेंबर रोजी रविंद्र पाटील यांनी “राजा माझा सांगून गेला” या विषयावर मार्गदर्शन करीत असतांना हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला. प्रा. डॉ. अतुल सूर्यवंशी यांनी भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाचा इतिहास या विषयावर इतिहासाचे वेगवेगळे समर्पक दाखले देत जिवंत इतिहास विद्यार्थ्यांसमोर सादर केला. दि: २९ डिसेंबर रोजी अॅड. भाग्यश्री महाजन यांनी उपस्थित स्वयंसेवकांना महिला सबलीकरण व कायदा या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. या दरम्यान सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांनी विशेष हिवाळी शिबिरास भेट देऊन उपस्थित स्वयंसेवकांना बँकिंग संदर्भात महत्त्वपूर्ण माहिती दिली.
कनिष्ठ महाविद्यालयाच्या या विशेष हिवाळी शिबिराचा समारोप पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन संजय वाघ यांच्या उपस्थितीत पार पडला. याप्रसंगी विविध स्पर्धांमध्ये विजयी स्वयंसेवकांना पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले. पारितोषिकांसाठी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. बी. एन. पाटील तथा कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक बंधू – भगिनींनी आर्थिक सहभागातून उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला. समारोपाच्या कार्यक्रम प्रसंगी मुख्याध्यापक गणेश पाटील, उपमुख्याध्यापक शैलेंद्र पाटील, ज्येष्ठ ग्रामस्थांपैकी प्रकाश पाटील, नगराज पाटील, सुभाष पाटील, सिद्धार्थ गायकवाड, आनंदराव पाटील, बापू पाटील, पितांबर पाटील, बंडू पाटील, अरुण पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. ओझर गावच्या सरपंचातर्फे स्नेह भोजन देण्यात आले. कनिष्ठ महाविद्यालयाचे विशेष हिवाळी शिबिर यशस्वी होण्यासाठी संस्थेचे व्हाईस चेअरमन तथा वरिष्ठ महाविद्यालयीन व्यवस्थापन समितीचे प्रमुख विलास जोशी, प्राचार्य डॉ. शिरीष पाटील, उपप्राचार्य प्रा. जी. बी. पाटील यांनी मार्गदर्शन केले. सदर विशेष हिवाळी शिबिर यशस्वी होण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख कार्यक्रम अधिकारी प्रा. संजू पाटील, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. अतुल सूर्यवंशी, महिला सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. छाया पाटील, प्रा. महेश पाटील, प्रा. आनंदा सरदार, प्रा. महेश नेरपगार, प्रा. संदीप पवार, प्रा. गिरीशचंद्र पाटील, प्रा. अमित येवले , प्रा. सुनील पाटील, प्रा. मनोज पवार, प्रा. श्रीमती वासंती चव्हाण, प्रा. श्रीमती विजया देसले, प्रा. श्रीमती एम. डी. चव्हाण, प्रा. श्रीमती एम. के. पाटील, प्रा. सुजाता पवार, प्रा. सुनिता सोहन्त्रे, प्रा. डॉ. सुनिता गुंजाळ यांनी परिश्रम घेतले. महाविद्यालयातील इतर प्राध्यापक बंधू – भगिनी तसेच शिक्षकेतर बंधूंनी अनमोल सहकार्य केले.