मेलबर्न वृत्तसंस्था । रोहित शर्माने एकाकी झुंज देत झळकावलेल्या शतकानंतरही भारताला तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात ३४ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. यजमान ऑस्ट्रेलियाने या विजयासह मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
ऑस्ट्रेलियाचे ५ बाद २८८ धावांचे लक्ष्य गाठताना जेसन बेहरेनडॉर्फ आणि जेये रिचर्डसन याने शिखर धवन ०, विराट कोहली ३ आणि अंबाती रायुडूला शून्यावर बाद करून भारताची अवस्था ३ बाद ४ अशी केली. माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला पाचव्या क्रमांकावर बढती देण्यात आली. रोहित शर्मा आणि धोनीने मग चौथ्या विकेटसाठी १३७ धावांची भागीदारी करत सामना जिंकण्याच्या आशा पल्लवीत केल्या. दरम्यान, दोन फलंदाजांनी आपली अर्धशतके पूर्ण केली तर धोनीने एकदिवसीय क्रिकेटमधील दहा हजार धावांचा पल्ला गाठला. रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांवर तुटून पडत असताना धोनीने मात्र संयम राखत त्याला साथ देताना आणखी पडझड होणार नाही याची काळजी घेतली. अखेर बेहरेनडॉर्फने धोनीला ५१ धावांवर पायचित केले. यानंतर दिनेश कार्तिक १२ आणि रवींद्र जडेजा ८ धावांवर बाद झाल्यामुळे रोहित शर्माला साथ देणारा प्रमुख फलंदाज उरला नाही. याच दरम्यान रोहित शर्माने एकदिवसीय क्रिकेटमधील आपले २२ वे शतक पूर्ण केले. या वेळी भारताला २६ चेंडूंत विजयासाठी ६८ धावांची गरज होती. भुवनेश्वर कुमारने २३ चेंडूंत चार चौकारांच्या सहाय्याने २९ धावा केल्या. तरीही भारताची मजल ५० षटकांत ९ बाद २५४ धावांपर्यंतच गेली. ऑस्ट्रेलियातर्फे जेये रिचर्डसनने २६ धावांत ४, तर मार्कस स्टॉईनीसने ६६ धावांत २ आणि जेसन बेहरेनडॉर्फने ३९ धावांत २ बळी घेतले..
तत्पूर्वी कर्णधार रॉन फिंचने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली, पण तोच आरंभीस बाद झाला. डावाच्या तिसर्या षटकातील दुसर्या चेंडूवर भुवनेश्वर कुमारने फिंचचा सहा धावांवर त्रिफळा उडवला. याच दरम्यान खलील अहमदने आपल्या चार षटकांत २४ धावा दिल्यावर कर्णधार विराट कोहलीने पॉवरप्लेमध्ये चेंडू कुलदीप यादवकडे दिला आणि त्यानेही यष्टिरक्षक-फलंदाज लेक्स कॅरेला २४ धावांवर बाद करून ऑस्ट्रेलियाची स्थिती २ बाद ४१ अशी केली. यानंतर मात्र शॉन मार्श आणि उस्मान ख्वाजाने तिसर्या विकेटसाठी ९२ धावांची भागीदारी केली. रवींद्र जडेजाने आत येणार्या चेंडूवर ख्वाजाला पायचीत केले. ़त्याने ८१ चेंडूंत ६ चौकारांच्या सहाय्याने ५९ धावा केल्या. शॉन मार्श आणि पीटर हॅण्ड्सकोम्बने ५३ धावांची भागीदारी केली. शॉन मार्शने चार चौकारांच्या सहाय्याने ५४ धावा केल्यावर कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर त्याने महम्मद शमीकडे झेल दिला. ऑस्ट्रेलियाची धावसंख्या वाढवण्याचे काम हॅण्ड्सकोम्ब आणि मार्क्स स्टॉईनीसने केले. या दोन फटकेबाज फलंदाजांनी ५९ चेंडूंत ६८ धावांची भागीदारी करून संघाला सावरले.