नवी दिल्ली : वृत्तसंस्था । छत्रसाल स्टेडियमवरील २३ वर्षीय सागर राणा हत्या आणि मारहाण गुन्ह्यातील आरोपी ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू सुशील कुमारला दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली आहे.
सुशील कुमारने दिल्लीतील न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी धाव घेतली होती. मात्र, न्यायालयाने जामीन फेटाळून लावला होता. या घटनेपासून सुशील कुमार फरार होता. सुशील आणि त्याच्या नऊ साथीदारांचा दिल्ली पोलिसांकडून शोध सुरू होता. सुशीलला पकडण्यासाठी पोलिसांनी एक लाखाचे रोख इनामसुद्धा जाहीर केले होते. अखेर त्याला अटक करण्यात दिल्ली पोलिसांना यश आले.
छत्रसाल स्टेडियमवर ४ मेच्या रात्री झालेल्या मारहाणीच्या घटनेत २३ वर्षीय कनिष्ठ राष्ट्रीय विजेता कुस्तीपटू सागर राणाची हत्या झाली, तर सोनू आणि अमित कुमार जखमी झाले. सुशील आणि त्याच्या नऊ साथीदारांचा दिल्ली पोलिसांकडून शोध सुरू होता. सुशील कुमारने अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते, मात्र हत्या, अपहरण आणि गुन्हेगारी कट अशा प्रकारचे आरोप सुशीलवर असल्यामुळे अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश जगदीश कुमार यांनी सुशीलचा जामीन नाकारला होता.
दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने ५ मेपासूनच सुशील कुमारच्या शोध सुरू केला होता. कारण मृत्यूची बातमी कळाल्यानंतरच सुशील कुमार घरातून फरार झाला होता, अशी माहिती पोलिसांनी यापूर्वी दिली होती. सुशील कुमारविरोधात काही सीसीटीव्ही फुटेजही सापडले होते. सुशील कुमारला अटक करण्यात आल्याची माहिती दिल्ली पोलीस विशेष सेलचे आयुक्त नीरज ठाकूर यांनी दिली आहे.
मारहाण आणि हत्या झालेल्या छत्रसाल स्टेडियमच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये सुशील कुमार आपल्या २० ते २५ साथीदारांसह सागर राणा आणि दोन अन्य व्यक्तींना मारहाण करताना दिसून आला आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये सुशील कुमार सागर आणि अन्य दोन व्यक्तींना हॉकी स्टिकने मारहाण करताना करत असल्याचं दिसत असून, फॉरेन्सिक सायन्स लॅबनेही हा व्हिडीओही खरा असल्याचं म्हटलेलं आहे.