ऑनलाइन सहाय्यता केंद्राच्या माध्यमातून आ. चव्हाणांचा पुढाकार

 

चाळीसगाव, प्रतिनिधी । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या वतीने दि.१७ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आल्याने मागील अनेक दिवसांपासून राज्यात व राज्याबाहेर अडकलेल्या नागरिकांना मूळगावी परत आणण्यासाठी शासनाने प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठी ऑनलाइन सहाय्यता केंद्र आ. मंगेश चव्हाण व त्यांच्या सौभाग्यवती प्रतिभाताई चव्हाण यांनी सुरु केले आहे.

राज्यात व राज्याबाहेर अडकलेल्या नागरिकांना मूळगावी परत आणण्यासाठी शासनाने प्रक्रिया सुरू केली असून त्यासाठी ऑनलाइन अर्ज स्वीकारले जात आहेत. काही आवश्यक कागदपत्रे देखील अपलोड करावी लागत आहेत. या ऑनलाईन प्रक्रियेत नागरिकांना अनेक अडचणी येत असल्याने आ. मंगेश चव्हाण यांनी आपल्या जनसेवा कार्यालयात ऑनलाइन सहाय्यता केंद्र सुरू केले आहे. कोरोनाच्या भीतीने लोकांना मदतीसाठी अनेकजण घराबाहेर निघत नसताना आमदार मंगेश चव्हाण यांच्या पत्नी व शिवनेरी फाउंडेशनच्या अध्यक्षा प्रतिभाताई चव्हाण यांनी मात्र लॉकडाऊनमुळे इतर जिल्ह्यात व राज्यात अडकलेले नागरिक यांना मदत करण्यासाठी स्वतः पुढाकार घेतला आहे. त्या स्वतः कार्यालयात हजर राहून येणारे अर्जदार यांच्या समस्या जाणून घेत त्यांना धीर देत आहेत. जनतेने दिलेल्या जबाबदारीचे भान ठेवत जनतेच्या सेवेसाठी पूर्णवेळ उपलब्ध असणारे आमदार मंगेश चव्हाण व त्यांच्या सौभाग्यवती प्रतिभाताई चव्हाण यांनी सुरू केलेल्या ऑनलाइन सहाय्यता केंद्र या उपक्रमामुळे कोरोनामुळे चिंतेत असलेल्या नागरिकांना दिलासा मिळत आहे. ही पूर्ण प्रक्रिया राबविण्यासाठी १० स्वयंसेवक पूर्णवेळ कार्यालयात सेवा देत आहेत. यासाठी नागरिकांनी जे व्यक्ती इतर जिल्ह्यात किंवा राज्यात अडकले आहेत किंवा ज्यांना चाळीसगाव तालुक्यातून इतर जिल्ह्यात अथवा राज्यात जायचे आहे त्यांनी आपले आधारकार्ड, स्थानिक सरकारी डॉक्टर यांचे कोविड लक्षणे नसल्याचे सर्टिफिकेट, पासपोर्ट फोटो तसेच इतर आवश्यक कागदपत्रे कार्यालयात येताना सोबत आणावेत असे आवाहन प्रतिभाताई चव्हाण यांनी केले आहे.

Protected Content