मुंबई प्रतिनिधी । आज सायंकाळपासून कडक निर्बंध सुरू होत असतांना एस.टी. महामंडळाच्या बसेस या फक्त अत्यावश्यक सेवांसाठीच धावणार असून त्यांच्या फेर्या कमी करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे.
राज्यातील एसटी वाहतूक सुरळीत चालावी यासाठी एसटी फक्त अत्यावश्यक सेवांसाठी चालेल, असे राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी स्पष्ट केले आहे. निर्बंध काळात एसटीच्या फेऱ्यांची संख्या कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचबरोबर एसटी कर्मचाऱ्यांच्या आरोग्यसेवेबाबत लवकरच बैठक घेऊन निर्णय घेण्यात येणार असल्याचे अनिल परब यांनी सांगितले.
यावेळी परब म्हणाले की, विरोधकांच्या टिकेपेक्षा आम्हाला जनतेच्या प्राणांची गरज आहे. यासाठी राज्यातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. राज्यात ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करण्यासाठी सगळेच प्रयत्नात आहेत. तसेच सोयीनुसार ज्या भागात ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात गरज भासणार आहे त्यांना लवकर देण्याबाबतही विचार सुरू आहेत. याचबरोबर ऑक्सिजनचा पुरवठा करताना येणाऱ्या अडचणीही दूर करण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत आहे.