हैदराबाद : वृत्तसंस्था | तेलंगणामध्ये तहसिलदाराच्या सांगण्यावरून ५ लाखांची रोकड लाच म्हणून ठेऊन घेतलेल्या एका व्यक्तीने ही सगळी रोकड गॅसवर पेटवून दिल्याचा प्रकार समोर आला आहे. एसीबीनं धाड टाकल्यामुळे हा प्रकार घडल्याचं समजतंय
८० च्या दशकामध्ये पाब्लो एस्कोबार नावाच्या एका कुख्यात आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्कराने आपल्या मुलीला थंडी वाजत असल्यामुळे कोट्यवधी रुपयांच्या नोटा जाळून टाकल्याचं सांगितलं जातं. पण नोटा जाळण्याचाच संदर्भ घ्यायचा असेल, तर भारतातही असे ‘पाब्लो एस्कोबार’ कमी नाहीत असंच काहीसं दिसतंय! कारण गेल्याच महिन्यात राजस्थानमध्ये एका तहसिलदाराने दारावर भ्रष्टाचारविरोधी पथकाचे अधिकारी आलेले पाहताच २० लाखांच्या नोटा जाळून टाकल्या होत्या.
तेलंगणाच्या नागरकुर्नूल जिल्ह्यामध्ये वेलदांडाचा तहसिलदार सैदुलुने वेंकटय्या गौड नावाच्या व्यक्तीला ५ लाख रुपये ठेऊन घ्यायला सांगितले होते. या तहसिलदाराने एका कामाला ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी संबंधिताकडून ही ५ लाखांची रक्कम लाच म्हणून घेतली होती. त्यामुळे ठरल्यानुसार संबंधित व्यक्तीने ५ लाख रोख गौडकडे दिले होते. मात्र, एसीबीला याची खबर लागली आणि ट्वीस्ट आला!
एसीबीनं वेंकटय्याच्या घरी छापा टाकला. दारावर एसीबीचे अधिकारी आल्याचं पाहून वेंकटय्याची घाबरगुंडी उडाली. एसीबीच्या जाळ्यात अडकण्याच्या भितीने वेंकटय्याने थेट किचनमधला गॅस पेटवला आणि ५ लाखांची रोकड गॅसवर ठेऊन दिली. पण यामुळे पुरावे नष्ट करण्याचा वेंकटय्याचा हेतू मात्र साध्य होऊ शकला नाही.
एसीबीनं अखेर घरात शिरून जळणाऱ्या ५ लाखांच्या नोटा विझवल्या. तब्बल ९२ हजार रुपयांच्या २ हजाराच्या ४६ नोटा पूर्णपणे जळून खाक झाल्याचं दिसून आलं. त्याशिवाय, ५०० रुपयांच्या आणि २ हजार रुपयांच्या काही नोटा काही प्रमाणात जळालेल्या अवस्थेत एसीबीच्या अधिकाऱ्यांसा आढळून आल्या. या प्रकारानंतर एसीबीनं वेंकटय्या गौड आणि संबंधित तहसिलदार सैदुलु या दोघांनाही अटक केली आहे.