एसटी वाहकांविषयी अपमानास्पद भाषा वापरल्याने कामगार सेनेतर्फे रोष

 

जळगाव, प्रतिनिधी । एसटी महामंडळाच्या परिपत्रकात एसटी वाहकांबाबत अपमानास्पद भाषा वापरण्यात आली आहे. याचा कामगार सेनेतर्फे निषेध व्यक्त करण्यात आला आहे.

 एसटी महामंडळाच्या भारमान वाढी संदर्भात उपाययोजना करण्याबाबत महाव्यवस्थापक (वाहतूक) यांनी नुकतेच राप/वाहन/चालन/ १४२१ (दिनांक १२/३/२०२०) चे परिपत्रक वजा आदेश प्रसारीत केलेले आहेत. या आदेशात त्यांनी उत्पन्न वाढीबाबत दिशानिर्देश दिलेले आहेत. परंतु सदर परिपत्रकात एसटी वाहकांबाबत आक्षेपार्ह वाक्य वापरून एसटी कर्मचाऱ्यांचे मनोबल कमी करण्याचा दुर्दैवी प्रयत्न केला गेला आहे असा आरोप एसटी कामगार सेना सरचिटणीस हिरेन रेडकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे. या परिपत्रकानुसार एसटी वाहकाने बसस्थानकावरच तिकीट देण्यास सुरुवात करावी, जेणेकरून एसटी वाहकास अपहार करता येणार नाही. असा स्पष्ट अपमानास्पद उल्लेख केलेला दिसून येतो. एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती सावरण्यासाठी सर्वात महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या सर्व घटकांपैकी एसटीचे चालक व वाहक हे सर्वोत्कृष्ट समजले जातात. एसटी महामंडळातील चालक व वाहक हे प्रत्यक्ष रस्त्यावर कामगिरी करत असल्याने त्यांची जनमानसातील प्रतिमा ही स्वच्छ राहिलेली आहे. त्यांच्या कर्तृत्वामुळेच एसटी महामंडळाच्या व्याप वाढून अतिशय खडतर परिस्थितीत देखील एसटीचे अस्तित्व टिकून राहिलेले आहे. एसटी प्रशासनाकडून २ टक्के भारमान वाढविण्यासाठी विषेश प्रयत्न सुरू असतांना व चालक वाहकांकडून अतिरिक्त श्रम पहावयास मिळत असतांना त्यांचे मनोधैर्य कमी करण्याचा प्रयत्न या पत्रकाद्वारे केल्याचे जाणवत आहे. तरी वरील एसटी कर्मचाऱ्यांची प्रतिमा जनमानसात मलिन करणाऱ्या अर्थात संदर्भित परिपत्रक काढणाऱ्या अधिकाऱ्याची चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, अशी विनंती उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांना करण्यात आली आहे. कार्यवाहीसाठी परिवहनमंत्री यांना देखील पत्र देण्यात आले आहे.

Protected Content