जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एलएलबी आणि एलएलएम अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना दोन विषयाच्या फेरतपासणीसाठी २५ एप्रिलपर्यंत मुदत देण्याचा निर्णय विद्यापीठाकडून घेण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसापासून विधी अभ्यासक्रमाच्या (एल. एल. बी व्दितीय सत्र व एल. एल. एम) निकालात त्रुटी असून पुन्हा तपासणी करण्यात यावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी वेळोवेळी निवेदनाव्दारे केली होती. दि. २८ मार्च रोजी विद्यापीठात जळगाव, धुळे व नंदुरबार या तीन जिल्ह्यातील सहा विधी महाविद्यालयाचे प्राचार्य व प्राध्यापक प्रतिनिधी यांच्या समवेत कुलगुरूंनी बैठक घेतली होती. या बैठकीत निकालाबाबत चर्चा झाली होती. या बैठकीतील निर्णयानंतर विद्यार्थ्यांच्या शंकाचे निरसन व्हावे यासाठी एल. एल. बीच्या सहा आणि एल. एल. एमच्या दोन विषयांच्या उत्तरपत्रिकांचे यादृच्छिकपणे (रॅंडमली) मूल्याकंन तज्ज्ञ प्राध्यापकांकडून करण्यात आले. यामध्ये विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये बदल झालेला आढळून आला नाही. विद्यापीठ नियमानुसार उत्तरपत्रिकेत एकुण गुणांमध्ये दहा टक्के बदल झाला तरच तो ग्राह्य धरला जातो. या तपासणीत फारसा बदल झालेला आढळून आला नसला तरी विद्यार्थ्यांचे शंकाचे निरसन व्हावे व विद्यार्थ्यांपर्यंत वस्तुस्थिती समजावी यासाठी सोमवार १७ एप्रिल रोजी कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांच्या उपस्थितीत विधी महाविद्यालयांचे प्राचार्य, विद्यार्थी संघटनांचे प्रतिनिधी व अधिकार मंडळाचे काही सदस्य यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक दीपक दलाल यांनी सविस्तर माहिती दिली. त्यानंतर झालेल्या चर्चेत विद्यापीठाच्या अध्यादेशाप्रमाणे दोन विषयांसाठी विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका रिड्रेसलला टाकण्याची संधी देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. २५ एप्रिलपर्यंत रिड्रेसलची मुदत विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे.
या बैठकीत प्र-कुलगुरु प्रा. एस. टी. इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, प्राचार्य डॉ. बी. युवाकुमार रेड्डी, प्राचार्य विजय बहीरम, प्राचार्य नितेश चौधरी, व्यवस्थापन परिषद सदस्य अमोल पाटील, अधिसभा सदस्य नितीन ठाकूर, ॲङ केतन ढाके, केदारनाथ कवडीवाले तसेच राहूल पाटील आदी उपस्थित होते. या बैठकीत कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांनी विद्यापीठाची शैक्षणिक गुणवत्ता कमी होवू नये यासाठी सर्व घटकांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले.