नवी दिल्लीः वृत्तसंस्था । भारतीय जीवन विमा महामंडळाची सार्वजनिक ऑफर (आयपीओ ) ऑक्टोबरनंतर येण्याची शक्यता आहे. कोरोना पीडित अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सरकारने निर्गुंतवणूकीतून पुढील आर्थिक वर्षात १. ७५ लाख कोटी रुपये उभे करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
एलआयसीच्या आयपीओच्या माध्यमातून सरकार मोठ्या प्रमाणात पैसे जमा करू इच्छिते. एलआयसीचे नेटवर्क देशातील सर्वात मोठे आहे आणि हे नेटवर्क आयपीओच्या माध्यमातून वापरावे, अशी सरकारची इच्छा आहे. लाखो लोक एलआयसी कंपनीशी संबंधित आहेत. एजंटांची संख्या १२ लाखांहून अधिक आहे.
डिसेंबर २०१९ पर्यंत कंपनीची एकूण गुंतवणूक ३० . ५५ लाख कोटींपेक्षा जास्त होती. त्यापैकी ६४८ कोटी रुपये भारत सरकारच्या वेगवेगळ्या कंपन्यांकडे आहेत, उर्वरित रक्कम पॉलिसीधारकांची आहे.
जीवन विमा महामंडळाचे एक लाखांहून अधिक कर्मचारी आहेत. एलआयसी एंडॉवमेंट, टर्म इन्शुरन्स, चिल्ड्रन्स, पेन्शन, मायक्रो इन्शुरन्सच्या सुमारे २८ . ९२ कोटी पॉलिसी सध्या बाजारात आहेत. २०१९-२० या आर्थिक वर्षात कंपनीने प्रीमियम उत्पन्नात २५ . १ ७ टक्के वाढ नोंदविली आहे. विमा बाजारात एलआयसीचा ७५ टक्के पेक्षा जास्त हिस्सा आहे.