एरंडोल, प्रतिनिधी । महाराष्ट्रात अडकलेले परप्रांतीय मजुरांना महाराष्ट्र सीमा रेषेपर्यंत मोफत बस सेवा देण्याचे जाहीर झाल्यामुळे त्यापार्श्वभूमीवर एरंडोल बस आगारातर्फे मध्य प्रदेशाच्या सीमेपर्यंत ४ बसेसच्या मदतीने पोहचविण्यात आले.
प्रथम मजूर प्रवाशांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली त्यानंतर संपूर्ण बस सॅनिटायझर करून निर्जंतुकीकरण करण्यात आले. सर्व मजूर प्रवाशांना मास्क लावून फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करीत एका सीटवर एक प्रवासी असे एकूण एका बसमध्ये २२ प्रवासी पाठवण्यात आले. याप्रसंगी तहसीलदार अर्चना खेतमाळीस,सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वप्निल उनवणे,आगार व्यवस्थापक व्ही.एन.पाटील,बस स्थानक प्रमुख गोविंदा बागुल, प्रदीप पाटील, संजय पल्लीवाड ,एम के मिस्तरी,एल. वाय .नेतकर,आदी उपस्थित होते. एक बस चोपडा शिरपूर मार्गे पळासनेर गावापर्यंत व दुसरी बस मुक्ताईनगरच्या पुढे इच्छापुर गावापर्यंत सोडण्यात आली. तिसरी बस पळासनेर गाव बिजासन घाटापर्यंत सोडण्यात आली व चौथी बस पारोळा धरणगाव येथील प्रवासी घेऊन मुक्ताईनगर पुढे मध्य प्रदेशाच्या सीमा रेषेपर्यंत सोडण्यात आली. दरम्यान, १७ मे पर्यंत जे परप्रांतीय मजूर बाहेर जात असतील अश्या एरंडोल धरणगाव व पारोळा हद्दीतील मजुरांना एरंडोल आगारातर्फे मोफत बस उपलब्ध करण्यात येईल. मजूर प्रवाशांना भाड्यापोटी पैशांची आकारणी केली जाणार नाही. तरी पायी जाणार्या मजुरांनी एरंडोल आगाराशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.