जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महावितरणने शहरात वीज मीटर तपासणीची धडक मोहीम शुक्रवारी राबविली. एरंडोल उपविभागाच्या पथकाने एकूण 210 वीज कनेक्शनची तपासणी या मोहिमेमध्ये केली. यात एकूण 32 मीटरमध्ये वीजचोरी असल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले. सदर मीटर तपासणीसाठी धरणगाव येथील चाचणी विभागात पाठविण्यात येणार आहेत. महावितरणने ग्रामीण भागानंतर शहरातही वीजचोरी मोहीम राबविल्याने वीजचोरांत खळबळ उडाली आहे.
ही मोहीम धरणगाव विभागाचे कार्यकारी अभियंता रमेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एरंडोल उपविभागाचे प्रशांत इंगळे यांच्या नेतृत्वात एरंडोल उपविभागातील सर्व अभियंता-कर्मचाऱ्यांनी राबविली. यात एरंडोल शहर कक्षाचे सहायक अभियंता पी. एस. महाजन, कासोदा कक्षाचे सहायक अभियंता राहुल पाटील, रिंगणगाव कक्षाचे सहायक अभियंता युवराज तायडे, गुणवत्ता नियंत्रण विभागाचे सहायक अभियंता जयदीपसिंग पाटील, एरंडोल ग्रामीण कक्षाच्या सहायक अभियंता लक्ष्मी माने, पिंपळकोठा कक्षाचे कनिष्ठ अभियंता इच्छानंद पाटील, प्रत्येक कक्षातील 2 जनमित्र व बाह्यस्रोत कर्मचाऱ्यांचा समावेश होता. या पथकातर्फे एरंडोल शहरातील गांधीपुरा या भागात तपासणी करण्यात आली. त्यानंतर संपूर्ण शहरातील मीटरची तपासणी मोहीम सुरूच राहणार आहे. तसेच जप्त करण्यात आलेल्या मीटरमध्ये वीजचोरी आढळल्यास वीजचोरीची बिले दिली जाणार आहेत. सदर बिल 48 तासाच्या आत न भरल्यास भारतीय विद्युत कायद्यान्वये पोलिस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात येणार आहे. सदर मोहिमेमुळे एरंडोल शहरात तसेच परिसरातील वीजचोरांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.