जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शनीपेठ परिसरातील भिलपूरा येथे तीन अज्ञात भामट्यांनी एका तरूणाचे एटीएम कार्डची अदलाबदल करून २० हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बुधवारी २१ सप्टेंबर रोजी शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, “दिपक सुधाकर सोनवणे (वय-१९) रा. कांचन नगर, जळगाव हा तरूण आपल्या परिवारासह राहतो. शनिवार, दि. १७ सप्टेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता भिलपूरा चौकातील ओव्हरसीज बँकेच्या एटीएम येथे पैसे काढण्यासाठी गेला. दरम्यान त्या ठिकाणी तीन अनोळखी व्यक्ती उभे होते. दिपक सोनवणे हा पैसे काढत असतांना पैसे निघाले नाही. म्हणून इतर तीन जणांनी पैसे काढण्यास मदत केली. यात तीनही भामट्यांनी पीन नंबर चोरून बघितला आणि तरूणाचे एटीएम कार्ड आदलाबदली करून घेत तरूणाच्या खात्यातून २० हजार रूपये काढून फसवणूक केल्याचे समोर आले.
याप्रकरणी तरूणाने शनीपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात तीन जणांविरोधात शनीपेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार रविंद्र पाटील करीत आहे.