नवी दिल्ली : वृत्तसंस्था । नवीन क्रेडिट कार्ड ग्राहक जोडण्यासोबतच सर्व प्रकारच्या डिजिटल व्यवसायातील नवे व्यवहार सुरू करण्यास भारतीय रिझर्व्ह बँकेने एचडीएफसी बँकेवर तात्पुरती बंदी घातली आहे.
खासगी क्षेत्रातील बड्या अशा एचडीएफसी बँकेला हा झटका असल्याचे मानण्यात येत आहे.एचडीएफसी बँकेने मुंबई शेअर बाजाराला पत्र पाठवून सांगितले आहे की, रिझर्व्ह बँकेने दोन डिसेंबर रोजी आदेश जारी केला आहे. एचडीएफसीच्या बँकेच्या इंटरनेट बँकिंग, मोबाइल बँकिंग व पेमेंट युटिलिटीसंदर्भात व्यत्यय येण्याचे प्रकार गेल्या दोन वर्षांमध्ये काही वेळा घडले होते. यामध्ये २१ नोव्हेंबर रोजी बँकेच्या प्रायमरी डेटा सेंटरमध्ये वीजपुरवठा बंद झाल्याच्या घटनेचाही समावेश आहे, ज्यामुळे इंटरनेट बँकिंग व पेमेंट यंत्रणेत व्यत्यय आला होता.
या प्रकारांमागील त्रुटी दूर करण्यास व या घटनांची जबाबदारी कुणाची हे निश्चित करण्यासही रिझर्व्ह बँकेने सांगितल्याचे एचडीएफसी बँकेने नमूद केले आहे. आम्ही आयटी यंत्रणेवर काम करत असून लवकरात लवकर यंत्रणा ठीक करू तसेच आरबीआयच्या संपर्कात राहू अशी हमी एचडीएफसी बँकेनं दिली आहे. या निर्बंधांचा बँकेच्या एकूण व्यवसायावर विपरीत परिणाम होणार नाही असा विश्वासही एचडीएफसी बँकेने व्यक्त केला आहे.