मुंबई, वृत्तसेवा । खासगी क्षेत्रातील एचडीएफसी बँकेने व्याजदरात कपात केली आहे. बँकेने सर्व मुदतीच्या कर्जदरात ०.१० टक्क्याची कपात केली आहे. गुरुवारी रिझर्व्ह बँकेने पतधोरणात प्रमुख व्याजदर जैसे थेच ठेवला होता.
एचडीएफसी बँकेने गेल्या महिन्यात कर्जदर ०.२० टक्क्याने कमी केला होता. शुक्रवारी बँकेने आढावा घेतला. ज्यात बँकेने कर्जदर ०.१० टक्क्यानी कमी केला आहे. नवे कर्जदर तात्काळ लागू झाले असल्याचे बँकेनं म्हटलं आहे. १ महिन्यासाठी कर्जदर ७.०५ टक्के झाला असून यापूर्वी तो ७.१५ टक्के होता. त्याच प्रमाणे ३ महिन्यांसाठी ७.१० टक्के, ६ महिन्यांसाठी ७.२ टक्के, १ वर्षासाठी ७.३५ टक्के , २ वर्षांसाठी ७.४५ टक्के आणि ३ वर्षांसाठी ७.५५ टक्के व्याजदर राहील, असे बँकेच्या संकेतस्थळावर म्हटलं आहे.
रिझर्व्ह बँकेकडून गुरुवारी ऑगस्ट व सप्टेंबरसाठीचे पतधोरण जाहीर करण्यात आले.. RBIने व्याज दरात कोणताही बदल केला नाही. बँकेने रेपो रेट आहे तसाच म्हणजे ४ टक्के इतका ठेवला आहे. रिझर्व्ह रेपो रेट देखील आहे तितकाच ३.३ टक्के इतका ठेवला आहे.. बँकेने व्याज दरात कोणताही बदल केला नसला तरी या वर्षात लॉकडाउनचा विचार करता दोन वेळा व्याज दरात १.१५ टक्के इतकी कपात केली होती.
पतधोरण जाहीर झाल्यानंतर सार्वजनिक क्षेत्रातील कॅनरा बँकेने व्याजदर कमी केला होता. कॅनरा बँकेने विविध मुदतीच्या कर्जाचा दर ०.३० टक्क्यांपर्यंत कमी केला होता. तर एक दिवसाचा ०.२० टक्क्याने कमी करून तो ७ टक्क्यांवर आणला. कॅनरा बँकेचा ३ महिन्याचा कर्जदर ७.१५ टक्के असून ६ महिन्यांसाठी ७.४० टक्के राहील. १ वर्षासाठी MCLR ७.४५ टक्के राहील, असे कॅनरा बँकेने म्हटलं आहे.