एका बेडसाठी 100 वेटिंगवर, रुग्णाच्या मृत्यूची सर्वांनाच प्रतिक्षा; जिल्हाधिकाऱ्याने सांगितला दाहक अनुभव !

 

गोरखपूर: वृत्तसंस्था ।  कोरोनाचं संक्रमण वेगानं होतंय.रुग्णालये भरून गेली आहेत. एकवेळ तर अशीही आली की, एका बेडसाठी 100 रुग्ण वेटिंगवर होते. ते  बेड मिळावा म्हणून त्या रुग्णाच्या मृत्यूची वाट पाहत होते. फारच भयावह चित्रं होतं. आयुष्यात असा प्रसंग पुन्हा पाहायला मिळू नये, असा दाहक अनुभव गोरखपूरचे जिल्हाधिकारी के. विजयेन्द्र पाण्डियन यांनी सांगितला

 

जिल्हाधिकारी के. विजेयन्द्र पाण्डियन यांचा सार्वजिनक कार्यक्रमातील एक ऑडिओ व्हायरल झाला आहे. गोरखपूर क्लबमध्ये देखरेख समितीच्या बैठकीतील हा ऑडिओ आहे. त्यात त्यांनी कोरोना काळातील धक्कादायक माहिती दिली आहे. दुसरी लाट फारच भयंकर आहे. हा आजार आपल्यासोबत तीन वर्ष राहणार आहे. त्यामुळे सावध राहा, कुटुंबाला सुरक्षित ठेवा, असं भावूक आवाहनही त्यांनी केलं.

 

 

एवढं सांगूनच ते थांबले नाहीत तर तिसऱ्या लाटेबाबतही त्यांनी चिंताही व्यक्त केली आहे. दुसरी लाट थोपवण्यासाठी आपण खूप प्रयत्न केले. त्यावर थोडं फार नियंत्रणही आणलं. पुढेही नियंत्रण आणू. एकटा व्यक्ती कोरोना रोखू शकत नाही. कोरोनाचं हे दुसरं वर्ष आहे. पुढील तीन चार वर्षे त्याचा सामना करावा लागेल. ही महामारी लवकर जाणार नाही, असंही ते म्हणाले. भारत हा आजार नियंत्रणात आणेल. अनेक छोट्या देशांनी हा आजार नियंत्रणात आणला आहे. दिल्लीत कुणी जरी निष्काळजीपणा केला तर त्याचं नुकसान सर्वांनाच सोसावं लागत आहे, असंही ते म्हणाले.

 

किती लाटा येतील आणि कुणा कुणाला घेऊन जातील काहीच सांगता येत नाही. देशातील खरं भांडवल ही जनता आहे. बाकीच्या गोष्टी पुन्हा मिळवता येतील. पण माणसं मिळविता येणार नाही. त्यामुळे आपण किती सतर्क राहतो, त्यावर सर्व काही अवलंबून आहे. अनेक देश मास्कपासून मुक्त झाले आहेत. कारण तिथले लोक त्यांच्या प्रमुखांचं ऐकतात. त्यामुळेच त्यांचा जीव वाचू शकला आहे, असंही त्यांनी सांगितलं.

 

आठ दहा दिवसात लॉकडाऊन उघडणे मजबुरी आहे. आर्थिक व्यवस्थाही मजबूत राहिली पाहिजे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत आमदारांनी चांगलं काम केलं आहे. पहिली लाट आली आणि गेली. ही लाट भयंकर आहे. या लाटेत तिसऱ्या दिवसात 80 टक्के फुफ्फुस संक्रमित होतं. पाचव्या दिवशी श्वसनाचा त्रास होतो. सातव्या दिवशी माणसाचा मृत्यू होतो. आपल्याला वेळच मिळत नाही, असं पाण्डियन यांनी सांगितलं

 

Protected Content