एकात्मिक आदिवासी विभागातील लाचखोर लेखापाल एसीबीच्या जाळ्यात

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल येथील आदीवासी प्रकल्प विभागातील लेखापाल याला भोजन ठेकेदाराकडून २० हजाराची लाच घेतांना जळगव लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे यावल तालुक्यात खळबळ उडाली आहे. रविंद्र बी. जोशी असे लाचखोर लेखापालाचे नाव आहे.

 

सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, यावल शहरात आदिवासी एकात्मिक प्रकल्प विभागात आदीवासी विद्यार्थ्यांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. यात शासनाच्यावतीने मोफत शिक्षण व जेवनाची सोय केली जाते. यात जेवनासाठी व्यवस्था शासनातर्फे जरी असली तरी याबाबचा ठेका दिला जातो.  तक्रारदाराची पत्नी चालवत असलेल्या बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून २०२१-२०२२ वर्षात भोजन पुरवठा करण्यात आला होता. त्यापोटी ७३ लाखांचे बिल मंजूर झाले मात्र काम करून देण्याच्या मोबदल्यात मंजूर बिलाच्या अर्धा टक्के अर्थात ३६ हजार ५००रुपयांची लाचेची मागणी आदीवासी प्रकल्प विभागातील लेखापाल रविंद्र बी. जोशी याने केली. तडजोडीअंती २० हजार रूपये देण्याचे ठरले. दरम्यान, याबाबत ठेकदाराने लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली. त्यानुसार शुक्रवारी २६ मे रोजी सापळा रचून लेखापाल याला २० हजार रूपयांची लाच घेतांना जळगाव लाचलुचपत विभागाने पकडले आहे. याबाबत यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

Protected Content