एकनाथराव खडसे यांना स्वतः निर्णय घ्यावा लागेल

 

उस्मानाबाद, वृत्तसंस्था । मागील काही दिवसांपासून भाजपचे जेष्ठ नेते एकनाथराव खडसे हे राष्ट्रवादीत प्रवेश करतील अशी चर्चा रंगलेली असतांना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ‘त्यांना जर राजकीय निर्णय घ्यायचा असेल तर, तो त्यांना पाहावा लागणार आहे’ असे मत व्यक्त केले आहे.

उस्मानाबादमधील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची पाहणी केल्यानंतर आज शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. यावेळी त्यांनी खडसेंच्या राष्ट्रवादीत प्रवेशावर भूमिका स्पष्ट केली. एकनाथराव खडसे यांच्या योगदानाबाबत शरद पवार यांनी कौतुक करत खडसे यांचे कर्तृत्व, जबाबदारी पहिली असल्याचे स्पष्ट करत राजकीय निर्णय काय घ्यायचा आहे, तो त्यांना पाहावा लागणार आहे, असं पवार म्हणाले.  तसंच, गेली २५ वर्ष पाहिली तर सर्वात प्रभावी विरोधीपक्ष नेते म्हणून खडसेंची ओळख आहे. पण, दुर्दैवाने त्याची दखल घेतली गेली नाही. त्यांना त्याबद्दल दु: ख वाटत असेल. त्यामुळे आपल्या कामाची जिथे नोंद घेतली तिथे जावे वाटते का, असा विचार करत असतील. पण, त्यांना आमच्या पक्षाबद्दल विश्वास वाटत असेल तर काही करता येणार नाही असं सूचक विधानही पवारांनी केले.
दरम्यान, राज्यपाल कोश्यारी यांनी जी भाषा वापरली, त्याबद्दल अमित शहा यांनी नाराजी व्यक्त केली. मी आजपर्यंत अनेक राज्यपाल पाहिले, त्यांच्याशी संबंधही आला. पण, असे भाष्य करण्याचे धाडस कुणी केले नाही. या पदाची प्रतिष्ठा राखता आली पाहिजे. त्यांनी मुख्यमंत्रिपदाची ही प्रतिष्ठा राखायला हवी, राज्यपालपदावर त्यांना राहायचे की नाही, हा त्यांचा निर्णय आहे, असं ही पवार म्हणाले.

Protected Content