मुंबई (वृत्तसंस्था) भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी पक्ष प्रवेश करून आगामी विधान परिषद निवडणूक लढवावी, अशी ऑफर कॉंग्रेसकडून देण्यात आल्याची चर्चा आहे.
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी लवकरच निवडणूक होणार आहे. संख्याबळानुसार भाजप चार, शिवसेना, राष्ट्रवादी प्रत्येकी दोन तर काँग्रेस एक जागा लढवू शकणार आहे. मात्र, या निवडणुकीत दोन जागा लढण्याची तयारी काँग्रेसने केली आहे. त्यासाठी एक उमेदवार घोषित करण्यात आला आहे. दुसऱ्या उमेदवारासाठी काँग्रेसने खडसे यांच्याशी संपर्क साधल्याची चर्चा आहे. दरम्यान, भाजपकडून सातत्याने डावलले जात असल्याने खडसे नाराज आहेत. ते पक्षांतराच्या निर्णयापर्यंत पोहचले असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने त्यांना ऑफर दिली आहे. विधान परिषदेची दुसरी जागा जिंकण्यासाठी काँग्रेसला १४ अतिरिक्त मतांची गरज आहे. खडसे यांनी विधान परिषद निवडणूक लढण्याची तयारी दाखवल्यास ते भाजपची मतं सहज वळवू शकतात, असा काँग्रेसचा अंदाज आहे. परंतू भाजपमधील नाराज असलेल्या आमदारांसोबत लॉकडाऊनमुळे प्रत्येकाशी संपर्क साधणे कठीण जाणार आहे. त्यामुळे पराभवाची भीती आहे. परंतू हमखास निवडून येणारी जागा मिळाल्यास ते काँग्रेसमध्ये प्रवेशाचा निर्णय घेऊ शकतात, अशीही माहिती समोर येत आहे.