जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । उसनवारीने पैसे दिले नाही या रागातून एकाने व्यवसायिकाला दगड फेकून मारत गंभीर दुखापत केल्याची घटना शनिपेठ परिसरातील दाळफळ येथे घडली आहे. याबाबत शनीपेठ पोलीस ठाण्यात रविवार ११ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, शहरातील शनीपेठ भागातील दाळफळ परिसरात सतीश सुधाकर भावसार हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. व्यापार करून आपला उदरनिर्वाह करतात. त्याच भागात राहणारा गौरव प्रकाश पाटील याने रविवारी ११ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता सतीश भावसार यांच्याकडे उसनवारीने पैसे मागितले परंतु सतीश भावसार यांनी पैसे देण्यास नकार दिला. याचा राग आल्याने गौरव पाटील याने हातात दगड घेऊन त्यांच्या अंगावर फिरवला. यात सतीश भावसार हे जखमी झाले तर त्यांच्या घरातील सदस्या शितल भावसार यांना शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली. या संदर्भात दुपारी २ वाजता शनिपेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी गौरव प्रकाश पाटील रा. दाळफळ परिसर, शनीपेठ जळगाव याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार रवींद्र पाटील करीत आहे.