मुंबई प्रतिनिधी । उद्योजकांना टार्गेट देऊन विकास गतिमान होणार नाही. विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी तशा प्रकारचा दूरदृष्टीकोन आणि सकारात्मक वातावरण तयार करणे आवश्यक आहे विकासाला चालना देण्यासाठी उद्योग धंद्यावरील अवाजवी हस्तक्षेप, सूक्ष्म नियंत्रण, संशयी दृष्टिकोन यासारखे अडथळे दूर करणे आवश्यक असल्याचे मत टाटा सन्सचे अध्यक्ष नटराजन चंद्रशेखरन यांनी व्यक्त केले आहे. नानी पालखीवाला स्मृती व्याख्यानमालेत ते बोलत होते.
उद्योग क्षेत्रातील सरकारच्या अति नियंत्रणावर चंद्रशेखरन यांनी नाराजी व्यक्त केली आहे. एकीकडे टाटा समूहाचे मानद अध्यक्ष रतन टाटा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांचे कौतुक केले असताना चंद्रशेखरन यांनी नाराजी व्यक्त केल्याने टाटा समूहाची सरकारविषयीची परस्पर विरोधी भूमिका दिसून आली. सरकारने इज ऑफ डुईंग बिझनेसला प्राध्यान दिले आहे. मात्र आपण पुन्हा एकदा विकास आणि अर्थव्यवस्थेबाबत फेरविचार केला पाहिजे. बिझनेस कल्चर हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. उद्योजकांना टार्गेट देऊन, त्यांच्या सतत मागे लागून विकासदर वाढणार नाही. लोकांना पाठी लागून विकासाची गंगा येणार नाही. त्यासाठी उद्योगातील अडथळे दूर करावे लागतील, असे चंद्रशेखरन यांनी सांगितले.