जळगाव प्रतिनिधी । आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंंबांसाठी शेतकरी संवेदना अभियानास उद्या २ फेब्रुवारीपासून प्रारंभ होत आहे.
याबाबत वृत्त असे की, जिल्ह्यात गेल्या पाच वर्षात सुमारे ४४३ शेतकर्यांनी आत्महत्या केल्या आहेत. अशा कुटुंबांंच्या दु:खावर फुंकर घालून त्यांना पुन्हा उभे करण्यासाठी भरारी फाउंडेशनने पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यातील सर्वाधिक ८५ आत्महत्या होणार्या पारोळा तालुक्यात मंगळवार २ फेब्रुवारी पासून शेतकरी संवेदना अभियानास प्रारंभ करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या उपस्थितीत याचे उदघाटन करण्यात येणार आहे.
मोरफळ (ता. पारोळा) येथे मंगळवारी सकाळी १० वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी.एन.पाटील, जिल्हा कृषी अधीक्षक संभाजी ठाकूर, कृषी उपसंचालक अनिल भोकरे, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, पारोळा प्रांताधिकारी, तहसीलदार, बीडीओ, कृषी अधिकारी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या अभियानासाठी के.के. कॅन्सचे रजनीकांत कोठारी, कृषी सम्राटचे बाळासाहेब सूर्यवंशी, स्पार्क इरिगेशनचे रवी लढ्ढा, सुरेश कलेक्शनचे मुकेश हसवानी, नवरंग चहाचे अमर कुकरेजा, नोबेल फाउंडेशनचे जयदीप पाटील यांचे सहकार्य लाभत आहे.