जळगाव, प्रतिनिधी | राज्यातील महाविद्यालये उद्यापासून सुरु होत आहे. यानुसार कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने नियमवाली जाहीर केली आहे. यात कोरोना प्रतिबंध लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या विद्यार्थीच महाविद्यालयात उपस्थित राहू शकतील असे विद्यापीठातर्फे कळविण्यात आले आहे.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांमध्ये एकावेळेला ५० टक्के विद्यार्थी किंवा त्या पेक्षा जास्त क्षमतेने सुरु करताना कोरोनाचा स्थानिक पातळीवरील प्रादुर्भाव व परिस्थिती, प्रतिबंधित प्रक्षेत्रांचे नियोजन व आरोग्यविषयक पायाभूत सुविधांची उपलब्धता याबाबी विचारात घेण्यात याव्यात. १८ वर्षावरील ज्या विद्यार्थी व विद्यार्थींनी लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. तेच विद्यार्थी व विद्यार्थींनी महाविद्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहू शकतील. जे विद्यार्थी व विद्यार्थींनी शासनाच्या परित्रकानुसार प्रत्यक्ष महाविद्यालयात/परिसंस्था व प्रशाळेत उपस्थित राहू शकणार नाहीत. त्यांना ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत सुध्दा कळविण्यात आले आहे. विद्यापीठाने कोविड-१९ संदर्भात वेळोवळी प्रसिध्द केलेल्या कोविड-१९ नियमावली पुस्तीका, मार्गदर्शक सूचना, परिपत्रके तसेच शासनाचे मानक कार्य प्रमाणील (एसओपी) या सर्व नियमांचे तंतोतंत पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे. ज्या विद्यार्थी, विद्यार्थींनी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कोविड-१९ ची लस घेतली नसेल त्यांनी महाविद्यालये, मान्यताप्राप्त परिसंस्था व विद्यापीठ प्रशाळा यांचे प्राचार्य व संचालक, विभाग प्रमुख यांच्या मदतीने स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधून लसीकरण प्राध्यान्याने पूर्ण करून केलेल्या कार्यवाहीचा अहवाल विद्यापीठास सादर करण्याचे सुध्दा निर्देश देण्यात आले आहे.