मुंबई: वृत्तसंस्था । उत्तर प्रदेशातील हाथरस व बलरामपूर येथील बलात्काराच्या घटनांवरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी वेगळीच शंका व्यक्त केली आहे. ‘उत्तर प्रदेशचं सरकार काहीतरी लपवतंय,’ असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला आहे.
मंत्रालयासमोरच्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास अभिवादन केल्यानंतर त्या बोलत होत्या. हाथरस व बलरामपूर येथील बलात्काराच्या घटनानंतर देशभरात संताप आहे. उत्तर प्रदेशातील योगी व मोदी सरकारवरही विरोधकांनी निशाणा साधला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी वेगळीच शंका उपस्थित केली आहे. ‘राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह काँग्रेस कार्यकर्त्यांना ज्या पद्धतीची वागणूक देण्यात आली आणि स्थानिक अधिकाऱ्यांनी ज्या प्रकारची वक्तव्ये केली ते पाहता उत्तर प्रदेश सरकार काहीतरी लपवू पाहतंय हे स्पष्ट आहे,’ असं सुळे यांनी म्हटलं आहे.
दोन दिवसांत उत्तर प्रदेशात बलात्काराच्या तीन घटना समोर आल्या आहेत. राज्याचे गृहमंत्री वा मुख्यमंत्री काहीही बोललेले नाहीत. पंतप्रधान मोदी यांनी लक्ष घालून सखोल चौकशी करावी,’ अशी मागणी सुळे यांनी केली आहे. ‘देशात अराजकासारखी परिस्थिती आहे. उत्तर प्रदेशातही कायदा-सुव्यवस्था राहिलेली नाही. योगी आदित्यनाथ यांच्या सरकारला उत्तर प्रदेशातील महिलांचं संरक्षण करता येत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा,’ असंही त्या म्हणाल्या.