नवी दिल्ली । इसीस या कुख्यात दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या कारणावरून एका काश्मिरी दाम्पत्याला अटक करण्यात आली असून यामुळे अतिरेकी कृत्याचा कट उधळण्यात आला आहे.
दिल्ली पोलिसांनी जहांबेज सामी आणि त्याची पत्नी हिना बशीर बेग यांना अटक केली आहे. या दोघेही सोशल मिडीयावर कमालीचे सक्रीय आहेत. दोघांचीही अनेक प्लॅटफॉर्मवर वेगवेगळ्या नावाने खाती आहेत. या खात्यांद्वारे भारतीय मुसलमानांना एकजूट करून आणि सरकारविरोधात सीएएवरून आंदोलन भडकविण्याचे काम सुरू होते.या हालचाली पाहता गुप्तचर यंत्रणेच्या विशेष पथकाने त्याच्यावर मागिल महिनाभरापासून नजर ठेवली होती. आयएसकेपीने त्यांच्यावर मुस्लिम तरुणांना संघटनेमध्ये भरती करण्याची जबाबदारी दिली होती. त्यांना याद्वारे मोठ्या दहशतवादी हल्ल्याला यशस्वी करायचे होते. सामीने त्याच्या पत्नीची इसिस समर्थक सोशल मिडीयावर तीन चार अकाऊंट असल्याचे सांगितले. हिना ही सोशल मिडीयावर दहशतवादी विचाराच्या तरुणांना शोधून त्यांच्याशी संपर्क साधण्याचे काम करत होती. तसेच त्यांना दहशतवादाशी जोडण्यासाठी मध्यस्थाची भुमिकाही पार पाडत होती. इसिसमध्ये अनेक भारतीय तरुण असून काही वर्षांपासून हे दहशतवादी अफगाणिस्तानच्या खोरासन या प्रांतामध्ये राहत आहेत. ते या दोघांच्याही संपर्कात असतात असेही पोलिसांनी सांगितले. दरम्यान, या दाम्पत्याच्या चौकशीतून अनेक रहस्य उलगडण्याची शक्यता आहे.