इलेक्ट्रिक डीपीच्या झालेल्या शॉर्टसर्किटमुळे शेतकऱ्याचे ५ लाखांचे नुकसान

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील एकलहरे शिवारात असलेल्या शेतात इलेक्ट्रिक डीपीच्या झालेल्या शॉर्टसर्किटमुळे शेतातील मक्का, गुरांचा चारा आणि ठिबक नळ्या एकूण ५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना घडली आहे. या संदर्भात मारवड पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, प्रभाकर राजाराम पाटील (वय-५५) रा. एकतास ता. अमळनेर हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. अमळनेर तालुक्यातील एकलहरे शिवारात शेत गट क्रमांक ६९ मध्ये शेत आहे. या शेतात त्यांनी मका कापून एक ठिकाणी जमा केलेला होता. त्याचा बाजूलाच गुरांसाठी चारा देखील एकत्रित ठेवलेला होता. दरम्यान ११ एप्रिल रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास शेतात असलेल्या महावितरण कंपनीच्या इलेक्ट्रिक डीपीच्या शॉर्टसर्किटमुळे आग लागली. या आगीत जमा केलेला १२० क्विंटल मका, गुरांचा चारा आणि ठिबकनळ्या जळून खाक झाल्याने एकूण ५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या संदर्भात शेतकरी प्रभाकर पाटील यांनी मारवड पोलीस ठाण्यात धाव घेऊन खबर दिली आहे. त्यांनी दिलेल्या खबरीवरून बुधवारी १२ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता मारवड पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहायक फौजदार किशोर पाटील करीत आहे.

Protected Content