जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या लाभासाठी इकेवायसी करण्यासाठीची ३१ मार्च पर्यंत मुदत होती, त्यासाठी आता मुदतवाढ देण्यात आली असून ३१ मे पर्यंत इकेवायसी करता येणार आहे, लाभार्थ्यांनी नजीकच्या सीसीसी सेंटरमध्ये जाऊन इकेवायसी करणे आवश्यक असल्याचे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यासाठी गेल्या २०१९ पासून योजना राबविली जात आहे. जिल्ह्यात ८-अ नुसार सुमारे ६ लाख ४६ हजार ४०० शेतकरी खातेदार आहेत. या योजनेंतर्गत एप्रिल २०२० पर्यंत ४ लाख ९० हजाराहून अधिक शेतकऱ्यांची नोंद होती, त्यापैकी जिल्ह्यात १३ हजाराहून अधिक शेतकरी करपात्र उत्पन्न असणारे आढळून आले. अशा शेतकऱ्याना नोटीस पाठवून नोव्हेंबर अखेर बहुताश शेतकऱ्यांनी परतावा देखील केला. या योजनेनुसार जिल्ह्यात ५लाख ५० हजाराहून अधिक शेतकऱ्यानी नोंदणी केली असून आतापर्यत बहुतांश शेतकऱ्यांना १० व्या हप्याचा लाभ देखील मिळालेला आहे.
केंद्र शासनाच्या निर्देशानुसार या योजनेतील पात्र लाभार्थी शेतकऱ्याना ३१ मार्च २०२२ पूर्वी इकेवायसी करण्याच्या सूचना होत्या, परंतु तांत्रिक अडचणीमुळे बहुंताश ठिकाणी तालुकास्तरावर इकेवायसी करण्यात अडचणी निर्माण झाल्याने लाभार्थी खातेदार शेतकऱ्यांना त्यांचे बँक खात्याशी इकेवायसी करणे शक्य झाले नाही. ज्या शेतकरी लाभार्थ्यांचे इकेवायसी राहिले आहे, अशा प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या लाभार्थ्यासाठी ३१ मे २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. पात्र लाभार्थी शेतकऱ्यांनी त्यांच्या नजीकच्या आपले सरकार, सीसीसी सेंटरमध्ये जाऊन इकेवायसी करून घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. इकेवायसी केल्यानंतरच लाभार्थ्यांना ११ व्या ह्प्याचा लाभ मिळणे शक्य होणार असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.