राज्यात अनेक ठिकाणी पाऊस; कोल्हापूरमध्ये ६० गावांचा संपर्क तुटला

मुंबई वृत्तसंस्था । राज्यभरात अनेक ठिकाणी मान्सून पाऊस मुसळधार कोसळत आहे. मुंबईतही बर्‍याच भागात मुसळधार पाऊस बरसतोय. मुंबईतील बोरिवली, कांदिवली, मालाड या भागात दमदार पाऊस झाला. कांदीवलीतील जूना लिंक रोडवर पावसाने थेट गटारींचे पाणी रस्त्यावर आले आहे. दुसरीकडे कोल्हापूरमध्ये झालेल्या अतिवृष्टीने जवळपास ६० गावांचा थेट संपर्क तुटला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील आतापर्यंत २५ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. यामुळे ६० गावांचा थेट संपर्क तुटला. पंचगंगा नदीची पाणीपातळी २५ फुटांवर आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील १२ धरण क्षेत्रांमध्ये २४ तासात अतिवृष्टी झाली. कोल्हापूर शहरात मात्र पावसाची उघडीप मिळाली. दुसरीकडे गगनबावडा आणि राधानगरी तालुक्यात अतिवृष्टी झाली.

नंदूरबारमधील सातपुड्याच्या डोंगररांगांमध्ये जोरदार पाऊस झाल्याने अनेक नदी नाले प्रवाहित झाले. सुसरी नदीला आलेल्या पुरात सुसरी नदीवर सुरु असलेल्या पुलाच्या बांधकामांचे साहित्य देखील वाहून गेले. या ठिकाणी असलेला जेसीबी आणि मोठ्या क्रेन पुराच्या पाण्यात अडकून पडल्या. पुरामुळे ठेकेदाराचे मोठे नुकसान झाले आहे. गेल्या 3 दिवसांपासून सातपुड्याच्या डोंगररांगांमध्ये जोरदार पाऊस होत आहे. या ठिकाणी उगम पावणाऱ्या नदी नाल्यांच्या पाण्याची पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. नदी काठावरील नागरिकांना प्रशासनाच्यावतीने सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी नदी नाल्याच्या पात्रात उतरु नये, असं आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

मागील दोन दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार असा पाऊस पडत आहे. या पावसाचा सर्वात जास्त फटका हा संगमेश्वर परीसरात बसला. त्यामुळे या परिसरात नदी नाले दुथडी भरुन वाहू लागले आहेत. याचवेळी मुंबई-गोवा मार्गावरील शास्त्रीपूल येथील पिकअप शेडमागील दरड कोसळल्याने तीन घरांना धोका निर्माण झाला परिसरातील इतरांना घर खाली करुन इतरत्र राहण्यास जाण्याच्या सूचना महसूल विभागामार्फत करण्यात आल्या आहेत.

Protected Content