चाळीसगाव, प्रतिनिधी । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील लोणजे येथे कै. मदनसिंग उदयसिंग राठोड यांच्या स्मरणार्थ मधुभाऊ रूग्णाश्रम विलगीकरण कक्षाची स्थापना करण्यात आली असून आमदार मंगेश चव्हाण यांनी सदिच्छा भेट देऊन रूग्णांची पाहणी केली.
चाळीसगाव येथे माजी विद्यार्थी एकत्रित येऊन कोरोना बांधीतांसाठी रूग्णाश्रम विलगीकरण कक्षाची नुकतीच स्थापना करण्यात आली आहे. याच धर्तीवर तालुक्यातील लोणजे येथे कै. मदनसिंग उदयसिंग राठोड यांच्या स्मरणार्थ मधुभाऊ रूग्णाश्रम विलिनीकरण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. डॉ. गोरख राठोड व डॉ. संदीप राठोड यांच्या अथक परिश्रमातून हे कक्ष स्थापन करण्यात आले आहे. या कक्षेत एकूण १० खाटांची व्यवस्था जरी करण्यात आलेली असली. तरी ती वाढवून २० करण्यात येणार आहे. तालुक्यातील ग्रामीण भागातील हे पहिले विलगीकरण कक्ष रूग्णांच्या सेवेत रूजू झाले आहेत. याबाबत सर्व स्तरातून कौतुक होत आहे. गावातील भुमिपुत्रांनी एकत्र येऊन कक्षाची स्थापना केली आहे. सध्या या विलगीकरण कक्षात एकूण ८ रूग्ण हे विलगीकरण होते. दोन जणांनी कोरोनावर मात केल्याने ते सुखरूप घरी परतले आहेत. दरम्यान रविवार,१३ रोजी आमदार मंगेश चव्हाण यांनी अचानक या रूग्णाश्रामास सदिच्छा भेट देऊन रूग्णांची पाहणी केली. पाहणी दरम्यान आमदार मंगेश चव्हाण यांनी रूग्णांना मानसिक आधार देत मनोबल वाढविले. तसेच बरे झालेल्या दोन रूग्णांना आमदार मंगेश चव्हाण यांनी गुलाबाचा गुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी आमदार मंगेश चव्हाण, ट्रामा केअर सेंटरचे डॉ. करंबेळकर मंदार, उमेश पवार, गोरख राठोड , डॉ. संदीप राठोड, डॉ. महेंद्रसिंग राठोड, पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
https://www.facebook.com/508992935887325/videos/920617758778012