जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील आसोद्यातील डांगरवाडा परिसरात तलवार घेवून दहशत माजविणाऱ्या तरूणाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्याच्या ताब्यातील लोखंडी धारदार तलवार हस्तगत केली. तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राहूल अशोक चौधरी (वय-२४) रा. डांगरवाडा आसोदा जि. जळगाव असे अटक केलेल्या तरूणाचे नाव आहे.
पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील आसोदा गावात एक तरूण बेकायदेशीर तलावार घेवून दहशत माजवित असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी पथकातील पोहेकॉ विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, राहूल पाटील, नितीन बाविस्कर, प्रितम पाटील यांना रवाना केले. पथकाने सकाळी ९.२५ वाजेच्या सुमारास गावात जावून संशयित आरोपी राहूल चौधरी याला अटक केली आहे. बेकायदेशीर असलेली तलवार हस्तगत केली आहे. याप्रकरणी पुढील कारवाईसाठी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.