आसाम-मिझोरामच्या सीमेवर तणाव; केंद्राने बोलावली बैठक

गुवाहाटी वृत्तसंस्था । आसाम आणि मिझोराम या दोन्ही राज्याच्या सीमेवर नागरिकांमध्ये झालेल्या हिंसक हाणामारीत अनेक लोक जखमी झाल्यानंतर दोन्ही राज्यांच्या सीमेवर तणावाची स्थिती आहे. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृह सचिव अजय कुमार भल्ला सोमवारी दोन्ही राज्यांसोबत होणाऱ्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. ही बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सकाळी ११.३० वाजता होणार आहे.

बैठकीला दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसहीत मुख्य सचिवही उपस्थित राहतील. आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी पंतप्रधान कार्यालय आणि गृह मंत्रालयाला ही माहिती दिलीय.

मिळालेल्या माहितीनुसार, मिझोरामचा कोलासिब जिल्हा आणि आसामचा कछार जिल्हा सीमेवर ही घटना घडलीय. शनिवारी आसाम-मिझोराम राज्याच्या सीमेवर एका कोविड परीक्षण केंद्रात नागरिक एकमेकांना भिडले आणि हिंसाचार उफाळला. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, मिझोरामच्या काही तरुण लायलपूरला येऊन ट्रक चालक आणि ग्रामस्थांवर हल्ला केला. काही तास सुरू असलेल्या या हिंसाचारात जवळपास १५ दुकानं आणि घरंही जाळण्यात आली. यानंतर स्थानिकांकडूनही या हल्ल्याला प्रत्यूत्तर देण्यात आलं.

आसाम सरकारनं जाहीर केलेल्या एका वक्तव्यानुसार, आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी मिझोरामचे मुख्यमंत्री जोरमथांगा यांच्याशी फोनवर संवाद साधून या घटनेबद्दल चर्चा केली. याबद्दल पंतप्रधान कार्यालयालाही माहिती देण्यात आलीय. या दरम्यान दोन्ही राज्यांत सीमावाद सोडवण्यावर आणि वाद सोडवण्यासाठी संयुक्त प्रयत्नांवर जोर देण्यात आला. जोरमथांगा यांनीही सोनोवाल यांना आंतरराज्य सीमेवर शांती स्थापन करण्यासाठी सहकार्य करण्याचं आश्वासन दिलयं.

Protected Content