आषाढी एकादशीसाठी यंदा पायी दिंडी जाणार नाही ; हेलिकॉप्टर, एसटी. किंवा विमानाने पादुका पंढरपूरला पोहचणार


पुणे (वृत्तसंस्था)
कोरोनाच्या महासंकटामुळे यंदा आषाढी एकादशीसाठी पायी दिंडी जाणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भात आज उपमुख्यमंत्री अजित पवार आणि वारकऱ्यांच्या प्रतिनिधींमधे पुण्यातील कौन्सिल हॉलमध्ये बैठक पार पडली. यावेळी आळंदी आणि देहुवरुन निघणाऱ्या पादुका हेलिकॉप्टर, एसटी. किंवा विमानाने पंढरपूरला नेण्यात याव्यात, अशी भूमिका मांडण्यात आली.

 

आळंदी आणि देहूच्या पादुका दशमीला पंढरपूरला जाणार आहे. या पादुका हेलिकॉप्टर, वाहन किंवा विमानाने न्यायच्या याबाबतचा निर्णय नंतर होणार आहे. पण देहू आणि आळंदीहून पायी दिंडी न नेण्याबाबत वारकरी आणि प्रशासनामध्ये बैठकीत एकमत झाले. ‘कोरोना’चा रोग झपाट्याने वाढत आहे. हा रोग संसर्गजन्य असल्याकारणाने गर्दी टाळणे, त्यावर एक उपाय समजला जात आहे. यामुळे पंढरपुरात लाखो भाविकांची भरणाºया आषाढी यात्रेबाबत निर्णय घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी बैठक घेतली आहे. या बैठकीसाठी सर्व प्रशासकीय अधिकारी, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे सहाय्यक अध्यक्ष ह.भ.प. गहणीनाथ महाराज औसेकर, प्रांत अधिकारी सचिन ढोले, कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, मंदिर समितीच्या सदस्या माधवी निगडे यांच्यासह अन्य महाराज मंडळी उपस्थित होती. या बैठकीत आषाढी वारी कशी पार पाडायची आणि आळंदी आणि देहुवरून पादुका पंढरपूरला कशा न्यायच्या? याबाबत आळंदी देवस्थानचे चोपदार, आळंदी, देहु आणि सोपानकाका संस्थानच्या विश्वस्तांनी त्यांच्या भूमिका मांडल्या. यावेळी वारकऱ्यांच्या प्रतिनिधींच्या वेगवेगळ्या भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ऐकून घेतल्या. दरम्यान आळंदी आणि देहुवरुन निघणाऱ्या पादुका हेलिकॉप्टर, बस किंवा विमानाने पंढरपुरला नेण्यात याव्यात अशी भूमिका मांडण्यात आली आहे.

Protected Content