अलाहाबाद : वृत्तसंस्था । उत्तर प्रदेशातील हाथरस येथे विनयभंग झालेल्या युवतीने बंदुकीच्या परवान्याची मागणी केली आहे. ज्यामुळे ती तिची आणि तिच्या कुटुंबाची सुरक्षा करू शकेल. आरोपीने या तरूणीच्या ५० वर्षीय वडिलांना गोळ्या घालून ठार मारल्याची घटना नुकतीच घडली आहे.
मुख्य आरोपी २८ वर्षीय गौरव शर्मा हा अद्याप फरार असल्याने तिला तिची आणि कुटुंबाच्या जिवाची भीती वाटत आहे, असे तिचे म्हणणे आहे.
तरूणीने शुक्रवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना आरोपीला ताबडतोब ताब्यात घेण्यात यावे अशी विनंती केली. तिने स्वत: ला आणि कुटुंबातील सदस्यांना आरोपींपासून वाचविता यावे यासाठी तिला बंदूक खरेदी करण्याचा आणि ठेवण्याचा परवाना द्यावा, अशी मागणी देखील केली आहे.
“घटनेच्या पाच दिवसानंतरही त्याला अटक करण्यात आलेली नाही… आमच्यासोबत काहीही घडू शकतं… जिवंत राहण्यासाठी मला बंदुक आवश्यक आहे. आत्तापर्यंत माझ्याकडे पोलिस बंदोबस्त आहे पण उद्या ही सुरक्षा मागे घेण्यात येईल तेव्हा काय होईल, ”असे या महिलेचे म्हणणे आहे.
पोलिसांनी वेळीच कारवाई केली असती तर तिच्या वडिलांचा जीव वाचला असता. मंदिरात गौरव, त्याची पत्नी आणि मावशी यांच्याशी झालेल्या वादावादीनंतर तिने स्थानिक पोलिसांना फोन करून गौरवने त्यांना धमकी दिल्याची माहिती दिली होती. स्थानिक पोलिसांनी कोणतीही कारवाई करण्याऐवजी तिला ११२ हेल्पलाईनला फोन करण्यास सांगितले होते, असा दावा तिने केला.