आरोग्य कर्मचारी भासवून अपात्र लोकांची कोरोना लसीकरणासाठी नोंदणी

 

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । नियमांचा भंग करून काही अपात्र  लोकही कोरोनाची लस घेत असल्याचं समोर आल्यानंतर केंद्राने लसीकरणासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी थांबविण्याचा  निर्णय घेतला आहे.

 

 

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. देशातील इतर गटातील नागरिकांचं लसीकरण करण्यासाठी केंद्राने पहिल्या फळीतील कोरोना योद्धे असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांची लसीकरण नाव नोंदणी थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने तसे आदेश सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना दिले आहेत.

 

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांच्या सचिवांना या संदर्भात पत्र पाठवले आहे. आरोग्य कर्मचारी आणि पहिल्या फळीतील कोविड योद्ध्यांची लसीकरण नोंदणीला तात्काळ थांबवावी, असे आदेश केंद्रीय सचिवांनी दिले आहेत. काही अपात्र लाभार्थी नियमांचा भंग करून या श्रेणीतून नोंदणी करत असल्याचे प्रकार समोर आले आहेत, असं केंद्राने म्हटलं आहे.  लसीकरण केंद्रांवर अपात्र लोकांची आरोग्य कर्मचारी आणि पहिल्या फळीतील कोविड योद्धे म्हणून नोंदणी केली जात आहे. हा प्रकार म्हणजे ठरवून दिलेल्या नियमावलीचा पूर्णपणे भंग करणारा आहे, असं केंद्रानं पत्रात म्हटलं आहे.

 

काही दिवसांत या श्रेणीतून नोंदणी करणाऱ्यांच्या संख्येत २४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. नोंदणीमध्ये अचानक झालेल्या वाढीनंतर केंद्रानं हा निर्णय घेतला आहे. “४५ वर्षांपुढील नागरिकांना को-विन प्रणालीवरून नोंदणी केली जाणार आहे. आतापर्यंत ज्या आरोग्य सेवा कर्मचारी आणि पहिल्या फळीतील कोविड योद्ध्यांच्या नावाची लसीकरणासाठी नोंदणी झालेली आहे. त्यांना लवकरात लवकर लस देण्यात यावी,” असं केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी पत्रात म्हटलं आहे.

Protected Content