आरोग्यक्षेत्रात काम करणाऱ्यांनी पुढे येऊन नावे नोंदवावीत : मुख्यमंत्री

मुंबई (वृत्तसंस्था) कोरोना युद्धात सहभागी होऊन शासनाच्या बरोबरीने काम करू इच्छिणाऱ्या आणि आरोग्य सेवेत काम केलेल्या लोकांनी जसे की आरोग्य सेवेत काम केलेले निवृत्त सैनिक, निवृत्त परिचारिका, वॉडबॉय, आरोग्य सेवेत प्रशिक्षण पूर्ण केलेले परंतू ज्यांना जागा नाही म्हणून काम मिळाले नाही पण त्यांना काम करण्याची इच्छा आहे त्या सर्वांनी पुढे येऊन आपले  नाव, पत्ता  [email protected]   या ई मेल वर नोंदवावे  असे आवाहन आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. समाजमाध्यमाद्वारे जनतेशी साधलेल्या थेट संवादादरम्यान ते बोलत होते.

 

सर्दी, पडसे आणि तापाचे लक्षणे असलेल्या रुग्णांची  तपासणी करून त्यांना त्यांच्या लक्षणाप्रमाणे पुढील उपचारासाठी स्वतंत्र रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे.  सौम्य लक्षणे, तीव लक्ष्णे आणि तीव्र लक्षणांबरोबर इतर तक्रारी आणि गंभीर आजार असलेल्या रुग्णांसाठी स्वतंत्र रुग्णालयांची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती ही त्यांनी दिली. तीव्र लक्षणे, गंभीर आजार व इतर तक्रारी असणाऱ्या रुग्णांना तिसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यात  येत असून ही रुग्णालये  ह्दयविकार, किडणी, मधुमेह यासारख्या सर्व प्रकारच्या आजारांवर उपचार करण्यासाठी सुसज्ज असल्याचे ते म्हणाले.

किमान आधारभुत किंमतीने धान्य द्यावे

श्री. ठाकरे पुढे म्हणाले की, केंद्र सरकारच्या अन्न सुरक्षा योजनेत केवळ तांदुळ मिळत आहे, त्याचे वाटप ही आपण सुरु केले आहे, परंतू त्याचा केशरी कार्डधारकांना लाभ होत नाही. प्रधानमंत्री महोदयांना यासंदर्भात विनंती करणारे पत्र आपण पाठवले असून किमान आधारभूत किंमतीवर मध्यमवर्गीयांना धान्य उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. ही सामुहिक जबाबदारी आहे. भार सर्वांवरच आहे. राज्य सरकारने कालच मंत्रिमंळाच्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेतल्याचे सांगतांना केंद्राने ही यात मदत करावी  अशी मागणी आपण केली आहे.

 

शिवभोजनची व्याप्ती आणि क्षमता दोन्ही वाढवल्या

शिवभोजन केंद्राची व्याप्ती वाढवतांना योजनेची क्षमता एक लाखापर्यंत वाढवल्याचे व यात आणखी वाढ करण्याची तयारी असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

 

स्थलांतरीतांच्या कॅम्पमध्ये  साडेपाच ते सहा लाख लोकांची व्यवस्था

 

लॉकडाऊनमुळे अडकलेल्या तसेच स्थलांतरीत मजुर कामगार आणि इतर राज्यातील लोकांसाठी जे कॅम्प सुरु करण्यात आले आहेत तिथे जवळपास साडेपाच  ते सहा लाख लोक वास्तव्याला आहेत. त्यांना एकवेळेसचा नाश्ता, दोनवेळेसचे जेवण दिले जात आहे. साधारणत: पाच लाख लोक धरले तरी तीन वेळा याप्रमाणे १५ लाख लोकांना दररोज माणुसकीच्या धर्मानुसार आपण  जेवण उपलब्ध करून देत असल्याची माहिती ही मुख्यमंत्र्यांनी दिली.

 

स्वत:चा मास्क इतरांना देऊ नका

 

मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्व मंत्री अंतर राखून बसले होते, प्रत्येकाने चेहऱ्याला मास्क लावले होते. हे सोशल डिस्टंसिंग आम्ही पाळतो,  तुम्हीही पाळा, जीवनावश्यक वस्तुंच्या खरेदीसाठी बाहेर जातांना गर्दी करू नका तसेच घरगुती स्वरूपात तयार केलेले मास्क लावूनच बाहेर जा असे आवाहन करून मुख्यमंत्री म्हणाले की, एकाचा मास्क दुसऱ्यांनी वापरु नये, वापरलेला साधा कपड्याचा मास्क गरम पाण्यात धुवून कडक वाळवून पुन्हा वापरावा, जे रेडिमेड मास्क वापरतील त्यांनी त्याची विल्हेवाट काळजीपूर्वक लावावी, सुरक्षित जागा पाहून हे मास्क जाळावेत व त्याची राख सुरक्षितपणेच फेकावी, म्हणजे विषाणुचा प्रादुर्भाव वाढणार नाही.

 

तंदुरुस्ती हवी

 

कोरोनाच्या संकटानंतर एक नवीन आर्थिक संकट उभे राहणार आहे, या संकटाशी सामना करण्यासाठी, या युद्धाला सामोरे जाण्यासाठी तंदुरुस्तीची आणि हिंमतीची आवश्यकता आपल्या सगळ्यांना पडणार आहे. त्यामुळे घरातच हलके फुलके व्यायाम करा, ज्यांना शक्य आहे आणि जमते त्यांनी योगा करा, घरातील वातावरण आनंदी ठेवा. हायरिस्कच्या नागरिकांनी खाण्यावर नियंत्रण ठेवावे अशा सूचना देऊन मुख्यमंत्र्यांनी वृत्तवाहिन्यांनीही घरातील वातावरण तणावमुक्त ठेवण्यासाठी बातम्यांप्रमाणेच इतर मनोरंजनाचे कार्यक्रम ठेवावेत, जुने कार्यक्रम दाखवावेत असे आवाहन केले.

 

रुग्णवाढीचा ग्राफ शुन्यावर आणायचा आहे

 

जगभरातील परिस्थितीचे गांभीर्य विशद करून मुख्यमंत्री म्हणाले की, आपल्याकडे रुग्ण सापडून ४ आठवडे पुर्ण झाले. लॉकडाऊन ने गैरसोय होतेय खरं आहे, पण सोशल डिस्टंसिंगसारखे दुसरे हत्यार आज आपल्याकडे नाही.  एवढे करूनही  संख्या वाढते आहे. परंतू आपल्याला ही वाढच नको आहे, रुग्णाचा वाढता आलेख आपल्याला शुन्यावर आणायचा आहे. त्यामुळे आपले घर हेच आपले गडकिल्ले आहेत, आपणच आपले संरक्षक आहोत हे लक्षात ठेऊन प्रत्येकाने वागायचे आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील रुगणांची संख्या, चाचणीची संख्या याची माहिती देतांना बरे होऊन घरी परतलेले ८० जण आहेत हे ही आवर्जुन सांगितले.

 

सुविधात वाढ

 

मुख्यमंत्र्यांनी आरोग्य प्रमाणित आरोग्य सुविधांमध्ये वाढ केली असल्याचे व भविष्यात ही करून देणार असल्याचा विश्वास यावेळी दिला. राज्यातील नागरिकांना यापुढेही सहकार्य देण्याची विनंती करून त्यांनी शासकीय यंत्रणेत काम करणाऱ्या आणि या युद्धाशी मुकाबला करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही धन्यवाद दिले.

Protected Content