आरक्षणावरील स्थगिती उठविण्यासाठी प्रयत्न करा – चंद्रकांत पाटील

कोल्हापूर । मराठा समाजासाठी सरकारने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले असून आता सर्वोच्च न्यायालयातील स्थगिती उठवण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत असेही त्यांनी नमूद केलं आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारने काल जाहीर केलेल्या निर्णयांचे स्वागत करत आता आरक्षणावरील स्थगिती उठविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले आहे. ते येथे म्हणाले की, खासदार संभाजीराजे मराठा आरक्षण प्रश्‍नी प्रयत्न करत असून लवकरच पंतप्रधान त्यांना भेट देतील. पण हा मुद्दा केंद्र सरकारचा नसल्याचं देखील चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी याप्रसंगी उध्दव ठाकरे यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी घरात बसून चालणार नाही. मुख्यमंत्र्यांनी दौरे केले पाहिजेत. ७ तास काम करून होत नाही, १८ तास काम करावं लागतं. उद्धव ठाकरे यांनी बाहेर पडून कामाला लागलं पाहिजे, असं ते म्हणाले. आम्ही अनेकवेळा मागणी केली होती की मातोश्रीमध्ये बसून राज्याचा कारभार हाकता येत नाही. संकट काळात मुख्यमंत्र्यांनी दौरे काढून यंत्रणेला जाग करणं गरजेचं असतं. मुख्यमंत्र्यांच्या दौर्‍यामुळे यंत्रणा कामाला लागते. मात्र आमचे मुख्यमंत्री कधी मातोश्रीतून बाहेर पडत नाहीत. बैठका वर्षा किंवा मंत्रायलात घ्यायला हव्यात. मात्र यांच्या बैठका महापौर बंगल्यात होतं असतात. सर्व काही आपल्या मर्जीप्रमाणे सुरू आहे ते काय बरोबर नसल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.

तर, पावसाने राज्यात अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. विशेषतः विदर्भ मराठवाडा याठिकाणी खूप नुकसान झालं आहे. मुख्यमंत्र्यांनी आता मातोश्री वरून बाहेर पडण्याची गरज त्यांनी व्यक्त करत ओला दुष्काळ जाहीर करण्याची आता वेळ आल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

Protected Content