जळगाव प्रतिनिधी । काही दिवसांपूर्वीच आयपीएलवर सट्टा घेणार्यांना अटक केल्यानंतर पोलिसांनी याच प्रकारचे गैरकृत्य करणार्यांना अटक केली आहे.
शहरातील सिंधी कॉलनी परिसरात आयपीएलवर सट्टा बेटींग घेणार्या रोहित गुलशन गेरा (वय २५, रा. लिलावती अपार्टमेंट, मोहाडी रोड) व आनंद गांधी (रा. अभियंता कॉलनी) या दोघांविरुद्ध जळगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील सिंधी कॉलनी परिसरातील जीत बेकरीजवळ एक तरुण मेल अॅपच्या माध्यमातून आयपीएलवर सट्टा बेटींग घेत असल्याची गोपनीय माहिती सहाय्यक फौजदार रामकृष्ण पाटील यांना मिळाली. या अनुषंगाने पोलिस निरीक्षक विनायक लोकरे यांनी अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, विजय बाविस्कर, किशोर पाटील, चेतन सोनवणे, सुधीर साबळे यांचे पथक तयार केले. या पथकाने सिंधी कॉलनी परिसरातून एकाला ताब्यात घेतले. तरुणाने त्याचे नाव रोहित गुलशन गेरा (वय २५, रा. लिलावती अपार्टमेंट, मोहाडी रोड, मूळ रा. मध्यप्रदेश रामलिला मैदान महितपूर जि. उज्जैन असे सांगितले.
चेन्नई सुपर किंग व राजस्थान रॉयल यांच्यात आबुधाबी येथे मॅच सुरु होती. सट्टासाठी आनंद गांधी यांच्याकडून रोहितने मॅचविन आयडी मागवून घेतला. हा आयडी मिळाल्यानंतर रोहित हा आयडी इतर लोकांना विकत होता. या आयडीवरुन लोक सट्टा बेटींग खेळत असल्याचे रोहितने पोलिसांना सांगितले. या अनुषंगाने स्टेट त्याच्यासह बँक कॉलनीतील आनंद गांधी या दोघांविरुद्ध पोलिस मुकेश पाटील यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला.