मुंबईः वृत्तसंस्था । हनी ट्रॅप मध्ये अडकलेल्या आणि पाकिस्तानी गुप्तहेर संघटना आयएसआयला गोपनीय माहिती पुरवणाऱ्या तरुणाला नाशिक येथून अटक करण्यात महाराष्ट्र एटीएसच्या पथकाला यश आलं आहे. दीपक शिरसाठ (वय ४१) असं या आरोपीचं नाव आहे.
नाशिकच्या हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमीटेड विमान कंपनीत हा तरूण कार्यरत होता. भारतीय बनावटीच्या विमानांची, विमानातील संवेदनशील तांत्रिक तपशील, हिंदुस्थान एरोनॉटिक्स कंपनीच्या नाशिक येथील कारखान्यातील प्रतिबंधित क्षेत्राची माहिती हा कर्मचारी आयएसआय या संघटनेला पाठवत होता.
हा कर्मचारी पाकिस्तानच्या आयएसआय या गुत्पहेर संघटनेच्या संपर्कात असून तो सर्व गोपनिय माहिती या संघटनेस पुरवत होता. त्याच्याविरुद्ध कलम ३, ४ आणि ५ शासकिय गुपित अधिनियम १९२३ अन्वये गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून ३ मोबाईल, ५ सिमकार्ड, दोन मेमरी कार्ड जप्त करण्यात आले असून फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी येथे विश्लेषणासाठी पाठवण्यात आले आहे. या आरोपी कर्मचाऱ्याला दहा दिवसांची पोलीस कोठडीत सुनावण्यात आली आहे.