मुंबई (वृत्तसंस्था) पक्षाचा झेंडा कुठला असावा याच्याशी राज्य निवडणूक आयोगाचा संबंध नाही. त्यामुळे आम्ही राज्य निवडणूक आयोगाला उत्तर देण्यास बांधील नाही,अशा शब्दात मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी निवडणूक आयोगाच्या नोटीसला प्रतिउत्तर दिले आहे. राज्य निवडणूक आयोगाने मनसेच्या नव्या झेंड्याबाबत मनसेला नोटीस बजावली होती.
मनसेच्या नुकत्याच पार पडलेल्या राज्यव्यापी अधिवेशनात पक्षाच्या नव्या झेंड्याचे अनावरण करण्यात आले होते. हा झेंडा भगव्या रंगाचा असून त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेची प्रतिमा आहे. मनसेच्या याच झेंड्यावर आक्षेप घेत संभाजी ब्रिगेड, मराठा महासंघ, जय हो फाऊंडेशन यांनी थोर व्यक्ती आणि चिन्हांचा गैरवापर केल्याची तक्रार राज्य निवडणूक आयोगाकडे दाखल करण्यात आली होती. त्यावर राज्य निवडणूक आयोगाने मनसेला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. या निवडणूक आयोगाच्या नोटीसीविरोधात मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. पक्षाचा झेंडा कुठला असावा याच्याशी राज्य निवडणूक आयोगाचा संबंध नाही, असे म्हटले आहे.