पाचोरा, प्रतिनिधी | पाचोरा – भडगाव मतदार संघातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आ. किशोर पाटील यांच्या पाठपुराव्यानंतर शासनाने १०० कोटींची मदत जाहीर केली आहे.
रब्बीत अवकाळीने पाचोरा – भडगाव मतदार संघात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. तर आता खरीपात अतिवृष्टीतही खरीप हंगाम पुर्णपणे झोपुन गेल्याने शेतकरी अडचणीत सापडला होता. या पार्श्वभूमीवर मी सातत्याने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेऊन शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत पाठपुरावा केला. त्याची फलश्रुती म्हणुन राज्य शासनाने रब्बी व खरीप या दोन्ही हंगामाची मदत जाहीर करून प्रत्यक्ष वाटपाला ही सुरवात झाली आहे. ऐन दिवाळीत दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांना तब्बल १०० कोटी रूपये मदत मिळणार असल्याचे आमदार किशोर पाटील यांनी त्यांचे निवासस्थानी आयोजित पत्रकार परीषदेत सांगितले. यावेळी जिल्हा उपप्रमुख अॅड. अभय पाटील, अॅड. दिनकर देवरे, डॉ. भरत पाटील, मा. जि. प. सदस्य दिपकसिंग राजपुत, प्रविण ब्राम्हणे, स्वीय्य सहाय्यक राजेश पाटील उपस्थित होते.
आमदार पाटील पुढे बोलतांना सांगितले की, रब्बी हंगामात मार्च महीन्यात भडगाव, पाचोरा तालुक्यात मोठ्याप्रमात नुकसान झाले होते. त्यावेळी मी स्वत: शेतकऱ्यांची व्यथा पाहिली. ते दुख: विसरून शेतकऱ्यांनी खरीप हंगाम उभा केला. मात्र पुन्हा ऑगस्ट ते ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टीत पाचोरा – भडगाव तालुक्यातील खरीप हंगाम पुर्णत: पाण्यात बुडाला. कापुस, मका, सोयाबीन, ज्वारी, बाजरी पिकांचे अतोनात नुकसान झाले. शेतकऱ्यांनी केलेला खर्च निघणेही मुश्किल झाले आहे. ही परीस्थीती पाहणे माझ्यासाठी अवघड होते. म्हणून मी शेतकऱ्यांशी फेसबुकव्दारे संवाद साधत शेतकऱ्यांना भरीव मदत देण्याचे वचन दिले. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, कृषी मंत्री दादा भुसे यांची भेट घेऊन शेतकऱ्यांना एस. डी. आर. एफ. च्या निकषाच्या तीन पट भरपाई द्यावी अशी मागणी केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला तर रब्बीत झालेल्या नुकसानीची ही तातडीने शेतकऱ्यांना भरपाई द्यावी ही मागणी केली. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी चार दिवसात रब्बी हंगामाच्या नुकसानीची मदत जाहीर केली. तर अतिवृष्टीची पुर्वीच्या निकषापेक्षा अधिकची मदत जाहीर केली. “रब्बी” चे १९ कोटी रुपये अनुदान – रब्बी हंगामाच्या नुकसानीपोटी जळगाव जिल्ह्याला ३५ कोटी रुपये अनुदान प्राप्त झाले. त्यापैकी तब्बल १९ कोटी ५० लाख रुपये अनुदान भडगाव- पाचोरा या तालुक्यांना मिळाले त्यातील १८ कोटी रुपये एकट्या भडगाव तालुक्याला तर पाचोरा तालुक्याला एक कोटी ३१ लाख रुपये एवढे अनुदान प्रत्यक्ष प्राप्त झाले आहेत. त्याचे वाटपाचे काम महसूल प्रशासनाकडून युद्धपातळीवर सुरू आहे दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात या अनुदानाचे पैसे जमा होणार आहेत. म्हणजे पाचोरा भडगाव मतदार संघाला ५० टक्के पेक्षाही अधिक अनुदान मिळवण्यात आपल्याला यश आले. याचे मोठे समाधान असल्याचे आमदार किशोर पाटील यांनी सांगीतले.
खरीपाला मिळणार ८० कोटी रुपये –
ऑगस्ट ते ऑक्टोबर दरम्यान पाचोरा भडगाव तालुक्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना साधारणपणे ८० कोटी रुपयांचे अनुदान मिळणार आहे. त्यात पाचोरा तालुक्याला ५० कोटी रुपये तर भडगाव तालुक्याला ३० कोटी रुपयांचे अनुदान मिळण्याचा प्राथमिक अंदाज आहे. याबाबत शासनाने कालच निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे दोन-चार दिवसात तेही अनुदान प्रत्यक्षरीत्या त्या – त्या तालुक्यांना प्राप्त होईल. त्यानंतर जलद गतीने अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होणार आहेत ्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी निश्चितपणे आनंदात जाईल याची मला खात्री आहे. आणि आनंदही असल्याचे आमदार किशोर पाटील यांनी सांगितले.
आमदार पाटील यांनी पुढे सांगितले की, अवकाळी आणि अतिवृष्टीमुळे दोन्ही तालुक्यातील शेतकरी प्रचंड अडचणीत होता. समोर दिवाळी सण असुनही शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद नव्हता. याचे खूप दुःख मला मनात बोचत होते. त्यामुळे शेतकऱ्यांची हीच व्यथा मी मुख्यमंत्र्यांकडे मांडली त्याची दखल घेऊन त्यांनी तातडीने मदत जाहीर केली. प्रत्यक्ष अनुदान वाटपाला सुरवातही झाली आहे. आपण दिवाळीपुर्वी अनुदान देऊ शकल्याचे अन् तर शेतकऱ्यांना दिलेले वचन पुर्ण करु शकल्याचे खुप मोठे समाधान आहे.
पाचोरा – भडगाव तालुक्यासाठी प्राप्त झालेली नुकसान भरपाई
मार्च ते जून २०२१ अवकाळी पाऊस नुकसान अनुदान – भडगाव तालुका १८ कोटी २० लाख रुपये
पाचोरा तालुका १ कोटी ३१ लाख रुपये
अतिवृष्टी अनुदान ऑगस्ट ते ऑक्टोबर २०२१
पाचोरा तालुका – अंदाजे ५० कोटी रुपये
भडगाव तालुका – अंदाजे ३० कोटी रुपये
एकूण जवळपास १०० कोटी रुपये