आमचे ३ नेते एकत्र असेपर्यंत कुणी मायीचा लाल सरकार पाडू शकत नाही — अजित पवार

 

पुणे: वृत्तसंस्था । ‘कितीदा सांगायचं की हे तीन नेते जो पर्यंत एकत्र आहेत तोपर्यंत कुणी मायचा लाल हे सरकार पाडू शकत नाही’, अशा शब्दांत अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांना प्रत्युत्तर दिले आहे.

 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या सरकार पाडण्याबाबतच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. ठाकरे सरकार झोपेत असतानाच पडेल, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. पाटील यांच्या या वक्तव्यावर अजित पवार यांनी जोरदार प्रहार केला आहे.

 

अजित पवार पुण्यात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. हे सरकार झोपेत असताना पडेल असे वक्तव्य करणारे चंद्रकांत पाटील यांना पवार यांनी सडेतोड उत्तर दिले. ‘मी वाटच पाहतोय की सरकार कधी पडतेय. सारखा झोपेतून उठतो की पडले की काय हे सरकार’, अशा शब्दांत अजित पवार यांनी पाटील यांच्या वक्तव्याची खिल्ली उडवली आहे.

 

‘चंद्रकांत पाटील मोठा माणूस आहेत. ते म्हणाले आहेत की, मी जर बोलायला लागलो तर फार फटकळ आहे, अमके आहे तमके आहे. कशाला उगाच त्यांच्या नादी लागायचे. आपलं दुरून डोंगर साजरे’, असे म्हणतानाच अजित पवार यांनी पाटील यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले.

 

महाविकास आघाडी सरकारला १८ महिने बोनसमध्ये मिळाले आहेत. आता लोक झोपत असताना कधीही सरकार पडेल, असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडताना केले होते.

 

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत आषाढी वारीसंदर्भातही एक बैठक पार पडली. या बैठकीत वारीसंदर्भात एक कमिटी नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीबाबत माहिती देताना पवार यांनी सांगितले की, ‘कुंभ मेळ्यानंतर कोरोनाचे संकट वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. वारकऱ्यांनाही ते समजावून सांगण्यात आले. असे वारीमध्ये घडू नये यासाठी पालखी सोहळ्याबाबत विचार करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीत विभागीय आयुक्त, तिन्ही जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असतील. या समितीचा निर्णय आल्यावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली जाईल. त्यानंतर वारीबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल.’

 

Protected Content