पाचोरा प्रतिनिधी । पाचोरा नगराध्यक्ष अपात्रता प्रकरणी आम्हाला उशीरा का होईना न्याय मिळाला असून भविष्यातही आमची ही लढाई सुरूच राहणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादीचे गटनेते संजय वाघ यांनी आजच्या पत्रकार परिषदेत केला.
पाचोरा नगराध्यक्ष संजय गोहिल यांना जिल्हाधिकार्यांनी अपात्र केल्यानंतर पाचोर्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या निर्णयानंतर आज सायंकाळी राष्ट्रवादीचे गटनेते संजय वाघ यांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणी आपल्या पक्षाची भूमिका मांडली. या पत्रकार परिषदेला नगरसेवक भूषण वाघ ,विकास पाटील, अजय अहिरे, वासुदेव महाजन, रोहित वाणी, टोंपे सर, शेवरे सर, टिकू वाघ, नितीन तायडे, विलास पाटील आदी उपस्थित होते.
उशीरा न्याय मिळाला
संजय वाघ यांनी आपल्याला उशीरा न्याय मिळाल्याची खंत व्यक्त केली. ते म्हणाले की, अनुसूचित जाती या वर्गवारीतून संजय नाथालाल गोहील निवडून आले होते. मात्र निवडणूक झाल्याच्या दिनांकापासून सहा महिन्यांच्या आत वैधता प्रमाणपत्र न दिल्यामुळे त्यांना अपात्र ठरवण्यात यावे अशी तक्रार पराभूत उमेदवार अजय भास्कर अहिरे यांनी केल्यामुळे त्यांना अपात्र करण्यात आले आहे. खरं तर सहा महिन्यांच्या आता प्रमाणपत्र न दिल्यामुळे त्यांना आधीच अपात्र करायला हवे होते. तथापि, असे झाले नाही. यामुळे आम्हाला उशीरा न्याय मिळाला.
संघर्ष कायम
संजय गोहिल यांच्या अपात्रतेची लढाई आता न्यायालयाकडे वळणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. यामुळे असे झाल्यास न्यायालयातदेखील आमच्या पक्षातर्फे संघर्ष कायम राहणार असल्याचे प्रतिपादन संजय वाघ यांनी केले. अर्थात आता शिवसेना आणि भाजपमधील ही लढाई कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
राष्ट्रवादीत चैतन्य
पाचोरा येथील शिवसेनेचे नगराध्यक्ष संजय गोहिल यांना जिल्हाधिकार्यांनी अपात्र ठरविल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गोटात उत्साहाचे वारे संचारले आहेत. लाईव्ह ट्रेंडस न्यूजच्या माध्यमातून ही बातमी सर्वात पहिल्यांना डिजीटल माध्यमांमध्ये शेअर झाली. अनेक ठिकाणी लोकांनी याच वृत्ताचे चर्वण केले. तर शिवसेनेतर्फे याबाबत सावध पवित्रा घेण्यात आला आहे. या पक्षातर्फे संबंधीत प्रकरणाबाबत अद्याप अधिकृत भाष्य करण्यात आलेले नाही. तथापि, संजय गोहिल हे या अपात्रतेला न्यायालयात आव्हान देण्याची शक्यता आहे.