मुंबई : वृत्तसंस्था । योगीजी पहिल्यांदा उत्तरप्रदेश भयमुक्त करा आणि मग फिल्म इंडस्ट्री नेण्याचा विचार करा, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी लगावला.
काही दिवसांपासून उत्तरप्रदेशात फिल्म सिटी उभारण्यात येणार असल्याची चर्चा सुरू होती. अखेर मुंबई दौऱ्यावर असलेले उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज याची अधिकृत घोषणा केली. सिनेसृष्टीतील निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकारांच्या भेटीनंतर योगींनी ही घोषणा केली. ‘कुणीही मुंबईतून काहीही हिसकावून घेत नाहीये. सगळी खुली स्पर्धा आहे. कोण चांगल्या सुविधा देतं यावर सगळं काही अवलंबून आहे’, असं त्यांनी यावेळी सांगितलं. त्यानंतर राष्ट्रवादीकडून त्यांच्यावर टीका करण्यात आली.
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशमध्ये फिल्म इंडस्ट्री नेण्याबाबत मुंबईमधील अभिनेत्यांशी चर्चा करायला आले आहेत. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी जोरदार हल्लाबोल केला. “योगीजी, तुम्ही एक गोष्ट विसरलात की उद्योग व व्यापाराकरिता भयमुक्त वातावरणाची आवश्यकता असते. तुमच्या उत्तरप्रदेशातील नागरिकांना तुम्ही ते एवढे वर्ष देऊ शकला नाहीत. दिवसाढवळ्या तुमच्या राज्यात बलात्कार, लूटमार, अपहरण होतं. या घटना तुमच्या राज्यातील लोकांना आता रोजच्याच झाल्या आहेत. पण उत्तरप्रदेशमध्ये येणाऱ्या नव्या व्यापाऱ्यांचे संरक्षण तुम्ही कसे करणार?”, असा प्रश्न तपासे यांनी योगी आदित्यनाथ यांना विचारला.