जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या वारसांना शासकीय नियमाप्रमाणे आर्थिक मदत दिल्यानंतर प्रशासकीय जबाबदारी संपुष्टात येत असली, तरी सामाजिक जबाबदारी कायम राहते. कुटूंबातील कर्ता व्यक्ती गेल्यानंतर संपूर्ण कुटूंब असह्य होते. विशेषत: शेतकरी बांधवांच्या कुटूंबियांना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. अशा कुटुंबांच्या पाठिशी शासन व प्रशासन खंबीरपणे पाठीशी आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पात्र वारसांना संजय गांधी निराधार योजनेतून लाभ मिळावा, यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिले.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते येथील अजिंठा शासकीय विश्रामगृह येथे जळगाव तालुक्यातील २ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी एक लाख रूपये मदतीचा धनादेश तर गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत धरणगाव तालुक्यातील बांभोरी बु., पिंप्री व बांभोरी प्र.चा. येथील 3 शेतकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी 2 लाखाप्रमाणे 6 लाखांचे धनादेश वाटप करण्यात आले. यावेळी तालुका कृषी अधिकारी पी. जे. चव्हाण व कृषी सहाय्यक उपस्थित होते.
50 लाखाचे सानुग्रह अनुदान वाटप
जिल्हाधिकारी, जळगाव यांच्या अधिपत्याखालील तहसील कार्यालय, जळगाव यांच्या आस्थापनेवर कार्यरत असलेले कर्मचारी कै. नाना लक्ष्मण वाघ (कोतवाल) राहणार शिरसोली यांचा कोव्हिड-१९ संबंधित कर्तव्य पार पाडताना कोरोना विषाणू संसर्गाने २८ मार्च, २०२१ रोजी मृत्यू झाला होता. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाठपुराव्याने त्यांना शासनाकडून ५० लाखाचे सानुग्रह अनुदान मंजूर करण्यात आले होते. कै. नाना लक्ष्मण वाघ यांच्या कायदेशीर वारसास ५० लाखाचे सानुग्रह अनुदान पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते देण्यात आले.
या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी अमन मित्तल, तहसीलदार नामदेव पाटील यांच्यासह महसुल विभागाचे अधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार नामदेव पाटील यांनी केले.