नवी दिल्ली : वृत्तसंस्था । कोरोना नियंत्रणासाठी उपाय भारतीय लष्करानं शोधला आहे. लष्कराच्या श्वानांकडून कोरोनाबाधिताचा शोध घेतला जाणार आहे. यासाठी श्वानांना प्रशिक्षण देण्यात आलं आहे. घामाच्या आणि मुत्राच्या नमुन्यातून संबंधित व्यक्ती बाधित आहे किंवा नाही हे कळू शकणार आहे.
लॅब्रेडोर आणि स्वदेशी जातीच्या खास श्वानानांच अशा प्रकारे बाधित व्यक्तीच्या नमुन्यातून रिअल टाइम शोध घेण्याचे प्रशिक्षण देण्यात आलं आहे. श्वानांना उपजतच ९५ टक्के संवेदनशीलता असल्याने त्यांचा यासाठी वापर केला जाणार असल्याचे या श्वानांचे प्रशिक्षक कर्नल सुरेंदर सैनी यांनी सांगितले.
कर्नल सैनी म्हणाले, “भारतीय लष्कराचं संबंधित युनिट प्रशिक्षणाच्या चाचण्या घेत असून या कामगिरीसाठी श्वानांना तैनातही करण्यात आलं आहे. विषाणूचा संसर्ग झालेली व्यक्ती शोधणे हे रिअल टाइम असणार आहे. नमुन्यांमुळे या श्वानांना संसर्ग होत नाही कारण हे नमुन्यांचे निर्जंतुकीकरण केलं जातं, त्यामुळे त्यामध्ये विषाणू नसतो. यामध्ये केवळ व्होलाटाईल मेटाबोलिक बायोमेकर असतं, ही जैविक प्रक्रिया म्हणजे एक प्रकारे कोरोना विषाणूचं प्रतिरुपचं असतं”
“संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या शरिरात खास प्रकारचे जैविक घटक तयार होत असतात, ज्याचा शोध खास वैद्यकीय शोध पथकातील श्वानांद्वारे घेता येतो. लष्कराने दोन श्वानांना प्रशिक्षण दिलं आहे. या श्वानांनी आत्तापर्यंत ३,००० नमुन्यांची तपासणी केली असून त्यात १८ जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.