नवी दिल्ली: वृत्तसंस्था । फ्रान्सकडून खरेदी करण्यात आलेली आणखी ३ राफेल विमानं अखंड ७ हजार किमीचा प्रवास करून बुधवारी रात्री भारतात दाखल झाली.
राफेल विमानांची ही तिसरी बॅच आहे. या राफेल विमानांनी ७ हजार किलोमीटरचा पल्ला नॉनस्टॉप पार केला. दरम्यानच्या काळात विमानांमध्ये हवेतच इंधन भरण्यात आले. हे इंधन भरण्यासाठी यूएई एअर फोर्सने पाठवलेल्या इंधन टॅकरसाठी वायूदलाकडून आभार मानण्यात आले आहेत.
यापूर्वी पाच विमानांची पहिली बॅच भारतात २८ जुलै रोजी दाखल झाली होती. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये विमानांची दुसरी बॅच भारतात दाखल झाली होती. भारताने फ्रान्सकडून एकूण ३६ राफेल विमानं विकत घेतली आहेत. यांपैकी आत्तापर्यंत भारतात तीन बॅचमध्ये एकूण नऊ विमानं दाखल झाली आहेत. येत्या मार्चमध्ये तीन आणखी राफेल विमानं भारतात दाखल होणार आहेत. त्यानंतर एप्रिल महिन्यांत आणखी सात विमानं येतील. अशाप्रकारे पुढील वर्षाच्या एप्रिल महिन्यापर्यंत भारतीय वायूदलाच्या ताफ्यात २१ राफेल विमाने असतील.
प्रजासत्ताक दिनी राजपथावर झालेल्या संचलनावेळी राफेल विमानाकडून हवाई प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. त्याचा वेग ताशी ९०० किलोमीटर होता. याठिकाणी त्याने चार्ली स्टंटही केले, ज्याने सर्वांनाच आश्चर्यचकित केले.
२ इंजिन असलेलं लांब असलेल्या लक्ष्याचा अचूक वेध घेण्याच्या दृष्टीनं राफेलची निर्मिती करण्यात आली आहे हवेतून जमिनीवर 300 किलोमीटरपर्यंत मारा करण्याची अण्वस्त्रसज्ज राफेलची क्षमता आहे