आज पुन्हा भर चौकात पाचोरा आगाराची बस फेल !

 

जळगाव प्रतिनिधी | कालच पाचोरा आगाराच्या बसचा रायसोनी कॉलेजजवळ मोठा अपघात होतांना वाचला असतांना आज पुन्हा याच आगाराची बस इच्छादेवीजवळ भरचौकात फेल झाल्याने या भागातील वाहतुकीचा काहीकाळ खोळंबा झाल्याचे दिसून आले.

 

काल रायसोनी कॉलेजवळ  एमएच १४ बीटी -२१७८ क्रमांकाच्या बसचा अपघात थोडक्यात टळला होता. चालकाने प्रसंगावधान राखल्याने बसमधील ४५ प्रवाशांपैकी कुणाला इजा झाली नाही. मात्र यातून मेंटेनन्स न होणार्‍या बसेसचा प्रश्‍न ऐरणीवर आला. विशेष बाब म्हणजे याच बसचा जळगावातील स्वातंत्र्य चौकात ७ मार्च रोजी ब्रेक फेल झाल्याने अपघात झाला होता. तेव्हाही ड्रायव्हरच्या प्रसंगावधानामुळे जीवीत हानी टळली. यामुळे खळबळ उडालेली असतांना आज पुन्हा एकदा पाचोरा आगाराचीच बस थेट चौकातच बंद पडल्याने खळबळ उडाली.

 

पाचोर्‍याहून जळगावकडे येणारी एमएच १४ बीटी-१६५० या क्रमांकाची बस इच्छादेवी चौकात बंद पडली. थेट मुख्य चौकातच बस बंद पडल्यामुळे येथे काही काळ वाहतुकीची कोंडी झाली. अखेर कशी तरी बस आगारात नेण्यात आली. तेथे बसची डागडुजी करण्यात आली. मात्र पाचोरा आगाराच्याच दोन बसेस लागोपाठ दोन दिवस नादुरूस्त झाल्याने खळबळ उडाली असून बसेसच्या सुरक्षितेतेचा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

 

Protected Content