हैद्राबाद (वृत्तसंस्था) चीनच्या वुहान येथून जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची लागण झाल्याच्या भीतीने आंध्र प्रदेशमध्ये एका ५० वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
हा आजार आपल्या मुलांना आणि पत्नीला होऊ नये म्हणून या व्यक्तिने हे पाऊल उचलले असल्याची चर्चा आहे. मृत व्यक्ती चितूर येथे राहणारा असून बाळा कृष्णा असे त्याचे नाव आहे. कृष्णा यांना ताप आला होता. यादरम्यान त्यांनी कोरोना व्हायरसचा एक व्हिडीओ पाहिला होता. त्यानंतर त्यांना असे वाटू लागले की, त्यांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. यावेळी त्यांनी कुटुंबियांना घरात बंद केले आणि आईचे अंत्यसंस्कार ज्या ठिकाणी केले तेथे जाऊन कृष्णा यांनी फाशी घेत आत्महत्या केली. दरम्यान, डॉक्टरांनी जेव्हा मृत कृष्णा यांची तपासणी केली तेव्हा त्यांच्या शरीरात कोरोना व्हायरस सापडला नाही. त्यांना साधा ताप आलेला होता.