नवी दिल्ली : वृत्तसंस्था | दिल्लीतील आंदोलक शेतकऱ्यांना उपयुक्त ठरू शकेल असे आंदोलनातील त्रास आणि उपायांचा तपशील सांगणारे ग्रेटा थनबर्गचे टूल किट सध्या चर्चेत आहे
स्वीडनची पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्ग भारतातील शेतकरी आंदोलनावर उघडपणे सोशल मीडियावर भाष्य करत आहे. आता हे टूलकिट बनवणाऱ्यांविरोधात दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आधी ग्रेटावर गुन्हा दाखल झाल्याची चर्चा होती, हेच टूलकिट ग्रेटाने शेअर केलं होतं.
दिल्ली पोलिसांच्या एफआयआर नंतरही ग्रेटाने आपण अजूनही शेतकरी आंदोलकांसोबत आहोत, असं सोशल मीडियावर लिहिलं. कोणतीही भीती किंवा धमकी मला रोखू शकत नाही, असं ग्रेटा म्हणाली. भारतातील शेतकरी आंदोलनाप्रती एकजूट दाखवू असं ग्रेटा म्हणाली.
टूलकिट हे एक असं डॉक्युमेंट आहे, ज्यामध्ये आंदोलनादरम्यान सोशल मीडियावर समर्थन कसं मिळवावं, कोणते हॅशटॅग वापरावेत, आंदोलनावेळी अडचणी आल्या तर कुठे संपर्क करावा, आंदोलनावेळी काय करावं, काय करु नये असा सर्व कार्यक्रम या टूलकिटमध्ये सांगितला आहे.
गेल्यावर्षी अमेरिकेत पोलिसांनी एका कृष्णवर्णीयाची भररस्त्यात हत्या केली होती. त्यावेळी तिथे ‘ब्लॅक लाईफ मॅटर’ ही मोहीम सुरु झाली होती. भारतासह जगभरातील सेलिब्रिटींसह नागरिकांनी रंगभेदाविरोधात आवाज उठवला होता. हे आंदोलन सुरु करणाऱ्यांनी टूलकिट बनवलं होतं.
यामध्ये आंदोलनाबाबत सर्व माहिती दिली होती. जसे – आंदोलनात कसं सहभागी व्हावं, कोणत्या ठिकाणी जावं, कुठे जाऊ नये, पोलिसांनी कारवाई सुरु केली तर काय करावं? आंदोलनावेळी कपडे कोणते घालावेत, ज्यामुळे आंदोलन योग्य व्हावं, पोलिसांनी पकडलं तर काय करावं? आंदोलकांचे अधिकार काय, अशी सर्व माहिती होती. हाँगकाँगमध्ये चीनविरोधात जे आंदोलन सुरु होतं, त्यावेळीही अशा प्रकारचं टूलकिट वापरण्यात आलं होतं.
पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्ग ही स्वीडनची नागरिक आहे. त्यामुळे दिल्ली पोलीस तिच्याविरोधात कारवाई कशी करणार, असा प्रश्न आहे. मात्र जो नागरिक आपल्या देशाचा नागरिकच नाही, त्याच्याविरोधात आपण कोणतीही कायदेशीर कारवाई करु शकत नाही, हे केवळ पोलिसांचं तंत्र आहे, असं तज्ज्ञ सांगतात.
ग्रेटाचा जन्म ३ जानेवारी २००३ रोजी स्टॉकहोममध्ये झाला. ग्रेटाचे आजोबा एस. अरहॅनियस वैज्ञानिक होते. ग्रीनहाऊस इफेक्टवर त्यांनी एक मॉडेल तयार केलं होतं, या कामगिरीमुळे रसायनशास्त्रातलं नोबल देऊन त्यांचा गौरव करण्यात आला होता. तिची आई मालेना एमान एक ऑपेरा सिंगर आहे, तर वडील स्वांते थनबर्ग अभिनेते आहेत.
ग्रेटा ११ वर्षांची होती तेव्हापासून ती ग्लोबल वार्मिंग आणि हवामानातील बदल थांबविण्यासाठी कार्यरत आहे. यासाठीच ग्रेटा दर शुक्रवारी स्वीडनच्या संसदेबाहेर निदर्शने करु लागली. तिने सुरु केलेली ही मोहीम #FridaysForFuture या नावाने ओळखली जाते. तिच्या या मोहिमेत आतापर्यंत अनेक देश जोडले गेले आहेत. ग्रेटाप्रमाणे जगभरातील हजारो मुलं ग्लोबल वॉर्मिंग आणि हवामानातील बदल थांबविण्यासाठी आवाज उठवित आहेत.