नवी दिल्ली : वृत्तसंस्था । दिल्लीच्या सीमा रेषांवर बसलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला शनिवारी १०० दिवस पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने शेतकरी आंदोलक दिल्लीकडे जाणाऱ्या महत्त्वाच्या महामार्गावर ६ मार्च रोजी रास्तारोको करणार असल्याचं वृत्त आहे.
देशात पुन्हा वाढू लागलेल्या कोरोना रुग्णांची चर्चा सुरू झाली आणि शेतकरी आंदोलनाची चर्चा हळूहळू मागे पडू लागली. मात्र, २६ जानेवारी रोजी झालेल्या प्रकारानंतर काहीसं थंडावलेलं शेतकरी आंदोलन शनिवारी म्हणजेच ६ मार्च रोजी पुन्हा जोर धरण्याची शक्यता आहे. डिसेंबर महिन्यापासून हजारो शेतकरी दिल्लीच्या सीमारेषांवर तंबू ठोकून आंदोलन करत आहेत. केंद्र सरकारने लागू केलेल्या नव्या कृषी विषयक कायद्यांना विरोध करण्यासाठी हे आंदोलन सुरू होत असून शनिवारी या आंदोलनाला १०० दिवस पूर्ण होत आहेत. केंद्र सरकारने हे कायदे रद्द करावेत आणि नंतर चर्चा करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
प्रामुख्याने पंजाब, हरयाणा आणि उत्तर प्रदेशमधले शेतकरी मोठ्या संख्येने दिल्लीच्या सीमारेषांवर आंदोलनाला बसले आहेत. शनिवारी दिल्लीकडे जाणाऱ्या एक्सप्रेस वेवर किमान ५ तास रास्तारोको केला जाईल, अशी माहिती शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी दिली आहे.
“दिल्लीतलं वातावरण आता अधिक कठीण होत जाईल. त्यामुळे आता आंदोलनाच्या १०० दिवसांनंतर केंद्र सरकारवर आमच्या मागण्यांबाबत नैतिक दबाव वाढू लागेल असं आम्हाला वाटतं”, अशी प्रतिक्रिया संयुक्त किसान मोर्चाचे प्रवक्ते दर्शन पाल यांनी दिली आहे. “यामुळे सरकार पिछाडीवर जाऊन आमच्याशी चर्चा करण्यासाठी बाध्य होईल”, असं ते म्हणाले आहेत. आत्तापर्यंत आंदोलक शेतकरी आणि केंद्र सरकारमध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या असून त्या सर्व निष्फळ ठरल्या आहेत. एकीकडे केंद्र सरकार आपल्या भूमिकेवर ठाम असून दुसरीकडे शेतकरी आंदोलक आपली भूमिका सोडत नसल्यामुळे आंदोलन अधिकच चिघळलं आहे.
२६ जानेवारी रोजी आंदोलकांनी दिल्लीच्या बाहेरच्या रस्त्यांवरून ट्रॅक्टर रॅली काढण्याचं नियोजन केलं होतं. मात्र, काही आंदोलक दिल्लीमध्ये शिरले. काही आंदोलक थेट लाल किल्ल्यावर देखील गेले आणि त्यांनी बाहेर शेतकरी आंदोलकांचा झेंडा फडकावल्याची दृश्य मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली होती. यावेळी आंदोलकांनी भारताचा तिरंगा लाल किल्ल्यावरून हटवल्याचा आरोप केला गेला. मात्र, नंतर हा आरोप खोटा असल्याचं स्पष्ट झालं. यानंतर कथित टूलकिट प्रकरण वाढू लागलं आणि या प्रकरणात भारतातील दिशा रवी, शंतनू मुळूक यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल होऊन त्यांच्यावर अटकेची कारवाई देखील झाली होती.